Shiv Sena Shinde Group News: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील नेते नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत करताना पाहायला मिळत आहेत.
हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शिक्षण धोरणातील तरतुदींना पाठिंबा दर्शवला असून, महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मनसेने आक्रमक पद्धतीने भूमिका मांडली असून, प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी याला पाठिंबा दिला आहे.
काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...
हिंदीमध्ये काहीही चूक नाही. मुलांना मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही. जे हिंदीला विरोध करतात, ते इंग्रजीला विरोध करत नाहीत. त्यांची मुले इंग्रजीत शिकतात, ते चुकीचे नाही, पण ते हिंदीला विरोध करत आहेत. इंग्रजी हा परदेशी विषय आहे. हिंदी ही देशाची भाषा आहे आणि आपण ती शिकली पाहिजे. ठाकरे गटाचे नेते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यावर काम करत आहेत. काही मनसे नेत्यांची मुले जर्मन आणि इंग्रजी शिकत आहेत. पण ते हिंदीला विरोध करतात, अशी टीका संजय निरुपम यांनी केली.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणाच्या मुद्द्यावर संजय निरुपम यांनी टीका केली. ठाकरे गटाच्या लोकांना सांगू इच्छितो की, ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे, तो बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात झाला आहे. ठाकरे गट वक्फला पाठिंबा देतो.