शिवसेना विरोधकांसोबत
By Admin | Updated: March 21, 2017 04:12 IST2017-03-21T04:12:05+5:302017-03-21T04:12:05+5:30
: राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या, मंगळवारी होत असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी

शिवसेना विरोधकांसोबत
मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या, मंगळवारी होत असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर कसेही करून जास्तीतजास्त ठिकाणी सत्ता आणण्याच्या प्रयत्नात प्रसंगी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची भूमिका भाजपाकडून घेतली जाऊ शकते. स्थानिक आघाड्या, अपक्षांचीही भूमिका महत्त्वाची ठरेल. काहीही करुन आपली सत्ता आणा, असे आदेश भाजपाच्या मंत्र्यांना पक्षाकडून देण्यात आले आहेत.
लातूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये भाजपाचे बहुमत असल्याने तेथे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच जाणार हे स्पष्ट आहे. तर पुणे आणि सातारामध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे जाईल. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे बहुमत असल्याने तेथे भगवा फडकणार हे नक्की आहे. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसची स्वबळावर सत्ता निश्चित आहे.
नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला असे सूत्र ठरले आहे. तर ६२ सदस्यीय औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस (१६) - शिवसेना (१९) एकत्र आल्याने त्यांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २३ सदस्य असलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी जवळीक केली आहे.
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जालन्यातील चित्र अस्पष्ट आहे. ५६ सदस्यसंख्या असून, त्यात भाजपाचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. शिवसेनेचे १४ आणि २ अपक्ष असे १६ संख्याबळ असून, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे ५ सदस्य आहेत. भाजपा-राष्ट्रवादी की राष्ट्रवादी-शिवसेना असे समीकरण होईल याबाबत अनिश्चितता आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी (२४) आणि काँग्रेस (६) अशी सत्ता स्थापन होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
हिंगोलीमध्ये शिवसेना (१५) - काँग्रेस (१२) - राष्ट्रवादी(१२) अशी आघाडी निश्चित दिसते. तेथे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी (२६) बहुमतापासून केवळ दोनने दूर आहे. मात्र, तेथे गेल्या वेळी जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेस-भाजपा-शिवसेना अशी आघाडी झाली तरच राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न तुटू शकते.
सांगलीमध्ये ६० सदस्य संख्या असून, त्यात सर्वाधिक २५ भाजपाचे आहेत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत आघाडीचे चौघे भाजपासोबत जातील. शिवसेनेचे तिघे भाजपासोबत येतील, असे मानले जाते. तसे झाले तर अध्यक्षपद भाजपाकडे जाईल.
सोलापूरमध्ये भाजपा, विविध आघाड्या आणि राष्ट्रवादीचे फुटीर सदस्य यांच्या आधारे सत्तेची मोट बांधली जाईल, असे चित्र आहे. तर गडचिरोलीमध्ये भाजपा-आदिवासी विद्यार्थी संघ-राष्ट्रवादी अशी युती होऊन सत्ता स्थापन होऊ शकते. भाजपा-आदिवासी विद्यार्थी संघ यांची युती झाल्यास संख्याबळ २७ होऊन बहुमताने सत्ता मिळू शकते. (प्रतिनिधी)
सदस्य अज्ञातस्थळी
अटीतटीच्या लढती असलेल्या बहुतेक जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येक पक्ष/आघाड्यांनीआपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले आहे. बंडखोरी होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यांना उद्या थेट मतदानालाच आणले जाईल.
स्थानिक पातळीवर निर्णय होतील
जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिथे शिवसेनेला मदत करण्याचा विषय असेल, तिथे तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले़ राज्यात भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे़ - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस