मुंबई - गेली १० वर्ष मनसेचा इतिहास पाहिला आणि त्यांच्या अध्यक्षांच्या बदलत्या भूमिका पाहिल्या ते अचंबित करणारे, बुचकळ्यात टाकणारे आहे. निश्चित धोरणे, पक्षाची विचारधारा काय हे फारसं निष्पन्न होत नाही. लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, विधानसभेला भाजपासोबत काही ठिकाणी मैत्री केली. भाजपाशी त्यांनी मैत्री असू दे आम्हाला काही देणेघेणे नाही परंतु आम्हाला मुंबईत ७-८ जागांवर मनसेमुळे फटका बसला. सदा सरवणकरांची सीटिंग जागा पडली. वरळीतही आमचे उमेदवार जिंकले असते. महायुती यायचंय आणि युतीतील घटकपक्षाचे नुकसान होत असेल तर आम्ही कुठल्या मनाने त्यांचं स्वागत करायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे असा निशाणा शिंदेसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर साधला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर मनीषा कायंदे यांनी हे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा महायुतीचं सरकार झाले तेव्हा एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे चित्र पूर्णपणे वेगळे होते. आमच्या ७-८ जागांचे नुकसान झाले हे आमच्यासाठी मोठे आहे. अद्याप युतीची चर्चा नाही. भाजपाचे नेते, आशिष शेलार हे राज ठाकरेंना भेटत असतात पण युतीचा विषय वेगळा आहे त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मागे जे काही झाले त्याचे उत्तर कुणीतरी दिले पाहिजे. अर्थात युतीचा निर्णय एकनाथ शिंदे यांचा आहे परंतु शिवसैनिक म्हणून माझ्या मनात एक शंका आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आकडेवारी पाहिली, मतदानाची टक्केवारी पाहिली मनसेमुळे आमच्या जागा पडल्या हे दिसते. मनसेने जिथे उमेदवार उभे केले तिथे आम्ही हरलो. त्यामुळे महायुतीत कुठल्या मनाने आम्ही स्वागत करायचे असा सवाल करत आमदार मनीषा कायंदे यांनी मनसेच्या महायुतीतील समावेशाला विरोध केला आहे.
दरम्यान, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आमचे मत नक्कीच व्यक्त करू. जेव्हा महायुतीत मनसेच्या समावेशाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे विचारतील तेव्हा आम्ही आमची मते त्यांना सांगू. मनसेला आमचा विरोध आहे. ज्या जागा पडल्या तिथले कार्यकर्ते विचारतील. माहिमसारखी आमची हक्काची जागा दीड हजार मतांनी पडलीय. तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता विचारात घेणे आवश्यक आहे असंही आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.