मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत. त्यापैकी गेटवे ऑफि इंडियाजवळील आंदोलन एका पोस्टरमुळे चर्चेत आलं आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ आंदोलन करणाऱ्या एका तरुणीनं हातात 'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. फडणवीस यांनी ट्विटमधून उपस्थित केलेल्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 'फ्री काश्मीरचा अर्थ संबंधित व्यक्तीनं सांगितल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा होतो. काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. तिथे आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी करत असल्याचं माझ्या वाचनात आलं आहे,' असं राऊत पुढे म्हणाले. काश्मीरला भारतापासून मुक्त करा, असं कोणी म्हणत असेल तर ते सहन करणार नाही, असा आक्रमक पवित्रादेखील राऊत यांनी घेतला.
संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:31 IST