औरंगाबादमध्ये शिवसेनेत दुफळी !
By Admin | Updated: October 3, 2015 03:43 IST2015-10-03T03:43:08+5:302015-10-03T03:43:08+5:30
महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आयुक्त हटाव मोहीम उघडली असताना सत्ताधारी शिवसेनेत मात्र दुफळी निर्माण झाली आहे

औरंगाबादमध्ये शिवसेनेत दुफळी !
औरंगाबाद : महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आयुक्त हटाव मोहीम उघडली असताना सत्ताधारी शिवसेनेत मात्र दुफळी निर्माण झाली आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी त्यास स्पष्ट विरोध दर्शवित स्वार्थापोटीच ही मोहीम राबविली जात असल्याचा घणाघाती आरोप स्वकीयांवर केला आहे.
पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात भाजपासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड भूमिका घेतली आहे. महिनाभरापूर्वीही शिवसेना भाजपासह काँग्रेस आणि एमआयएमने आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाची तयारी केली होती. परंतु त्या वेळी भाजपातील वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर ही मोहीम थंडावली. आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांविरुद्ध नव्याने मोहीम उघडली असून, त्याला सेनेच्या मनपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. तसेच सेनेचेच असलेले पालकमंत्री रामदास कदम यांनीही शुक्रवारी भाजपाच्या शिष्टमंडळाला आयुक्त हटाव मोहिमेस त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
खा. खैरे यांनी मात्र विरोधात भूमिका घेतली आहे. खैरे यांनी मनपातील सेनेचे तसेच भाजपाचे पदाधिकारी स्वार्थापोटीच आयुक्त हटाव मोहीम राबवीत आहेत, असा आरोप केला. आयुक्तांच्या सेवानिवृत्तीला तीन महिने राहिले असताना त्यांना हटविणे चुकीचे आहे. शासन निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्याची बदली करीत नाही. प्रकरण ताणू नये, असे खैरे म्हणाले.
खैरेंना डावलले
मनपाच्या स्वच्छता सप्ताहाला शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सुरुवात झाली. परंतु खा. खैरे यांना या कार्यक्रमात डावलण्यात आले. मनपाच्या वतीने त्यांना निमंत्रणही दिले गेले नाही. खैरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मला मनपातील कुणीही निमंत्रण दिले नाही. मग मी तरी कशाला जाऊ? मला रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी निमंत्रण दिले होते. त्यामुळे मी रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता मोहिमेला गेलो होतो.