शिवसेना जिल्हाप्रमुख अटकेत

By Admin | Updated: December 8, 2015 00:41 IST2015-12-08T00:05:46+5:302015-12-08T00:41:13+5:30

पोलीस कोठडी : नगरसेवक अपहरण प्रकरण, अन्य दोघांनाही अटक

Shiv Sena district chief arrested | शिवसेना जिल्हाप्रमुख अटकेत

शिवसेना जिल्हाप्रमुख अटकेत

रत्नागिरी : देवरुख नगराध्यक्ष निवडणुकीतील झालेल्या अपहरण नाट्यप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांपासून दूर असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व अन्य दोघांनी सोमवारी पूर्णगड पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाडिक यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
२६ आॅक्टोबर २०१५ रोजी देवरुख नगरपंचायतीची नगराध्यक्ष निवडणूक होती. मात्र २५ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार नीलेश भुरवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल भुवड व भाजपचे देवरुख शहराध्यक्ष कुंदन कुलकर्णी या तिघांचे पूर्णगडमधून अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तत्काळ ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून तत्काळ सूत्रे हलविण्यात आली. पोलिसांनी अपहरण केलेल्या तीनही लोकप्रतिनिधींची सुटका केली. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मनीष सावंत व मंगेश शिंदे यांना अटक करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी संशयित असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक (५०, कसबा, संगमेश्वर), संगमेश्वरचे माजी सभापती व नगरसेवक नंदादीप उर्फ बंड्या नंदकुमार बोरूकर (३६, देवरुख) व अजित उर्फ छोट्या गवाणकर (३२, देवरुख) हे पोलिसांची नजर चुकवित होते. त्यांना सोमवारी पूर्णगड पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे साहाय्यक सरकारी अभियोक्ता वर्षा दत्तात्रय प्रभू यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

अटकपूर्व जामीन अर्ज मागे
जिल्हा न्यायालयाने राजेंद्र महाडिक यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला. त्यानंतर पूर्णगड पोलीस ठाण्यात सोमवारी ते हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
महाडिकांची प्रकृ ती बिघडली
न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत राजेंद्र महाडिक यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची प्रकृ ती बिघडली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत उघडे चार दिवसांपूर्वीच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पत्रकार परिषदेच्यावेळी देवरुखच्या नगरसेवक अपहरणप्रकरणी उर्वरित संशयितांवर कारवाई कधी करणार, असा सवाल पत्रकारांनी केला होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी लवकरच कारवाई होईल, असे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Shiv Sena district chief arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.