शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही-उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 13, 2014 04:44 IST2014-10-13T04:44:45+5:302014-10-13T04:44:45+5:30
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि तो दिल्लीची भांडी घासणार नाही, दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही,

शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही-उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि तो दिल्लीची भांडी घासणार नाही, दिल्लीसमोर शेपूट हलवणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या सभेत दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत शिवसैनिकांना साष्टांग दंडवत घालून या संकटाच्या काळात मला व आदित्यला सांभाळून घेण्याचा बाळासाहेबांच्या आवाहनाचा विसर पडू देऊ नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
येती विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जिंकणार आहे. शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव २०१६ साली होणार आहे. तोपर्यंत शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने ५० योजना पूर्ण केलेल्या असतील. भाजपाने टाकलेल्या अटी स्वीकारल्या असत्या तर शिवसेना संपली असती त्यामुळे आपण जे केले ते योग्य केले ना, असा सवाल उद्धव यांनी केला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘कदम मिलाके चलना होगा' या काव्यपंक्ती उद्धृत करून उद्धव म्हणाले की, संकटे होती तेव्हा शिवसेनेने भाजपाला साथ दिली. मात्र अच्छे दिन आले तेव्हा त्यांनी साथ सोडली. उद्धव यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे युती तुटल्याचा दावा भाजपाचे नेते करतात; परंतु हरियाणात कुलदीप बिष्णोईसोबतची युती भाजपाने का तोडली, असा सवाल त्यांनी केला. स्वतंत्र विदर्भाची भूमिका तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल करून शिवसेनेचे सरकार आल्यास कर्नाटकव्याप्त सीमाभाग महाराष्ट्रात आणण्याची घोषणा त्यांनी केली. (प्रतिनिधी)