उमेश जाधव, टिटवाळानुकत्याच पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार सुनीता संजय दाभाडे (३१) या दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्या आहेत. यामुळे मांडा-टिटवाळा परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे.शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास सुनीता दाभाडे या भिशीचे पैसे आणण्यासाठी जात आहे, असे सांगून घरातून निघून गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. आपल्या सर्व नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोधाशोध केली. परंतु, त्या कुठेही न मिळाल्याने अखेर त्यांचे पती संजय यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. दाभाडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ८ मांडा (प.) येथून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची ७५२ मते मिळाली होती. दरम्यान, मांडा पश्चिम येथील एकवीरानगर हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या सुनीता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी दिली.
शिवसेनेच्या उमेदवार सुनीता दाभाडे बेपत्ता
By admin | Updated: November 23, 2015 02:06 IST