शिवसेना - भाजपाचं ठरलं.... युती तर होणारच ?
By Admin | Updated: November 26, 2014 12:26 IST2014-11-26T12:21:08+5:302014-11-26T12:26:00+5:30
शिवसेना - भाजपा युतीविषयी महिनाभर खलबतं केल्यानंतर अखेर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी राजी झाल्याचे वृत्त आहे.

शिवसेना - भाजपाचं ठरलं.... युती तर होणारच ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - शिवसेना - भाजपा युतीविषयी महिनाभर खलबतं केल्यानंतर अखेर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी राजी झाल्याचे वृत्त आहे. शिवसेना आगामी काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असून केंद्रातही शिवसेनेच्या वाट्याला राज्यमंत्रीपद येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या दहा नेत्यांचा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाची आशा सोडून दिली असली तरी गृह खाते हे शिवसेनेकडे जाईल असे समजते. सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, ग्रामविकास, उर्जा ही खातीही शिवसेनेला दिली जातील अशी चिन्हे आहेत. मात्र खातेवाटपाचा अंतिम निर्णय पक्षाचे राज्यातील नेतेच घेतील असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार अनिल देसाई यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनिल देसाई यांना राज्यमंत्रीपद दिले जाणार होते. मात्र राज्यातील निर्णय होत नसल्याने देसाई दिल्ली विमानतळावरुनच माघारी परतले होते. शिवसेना - भाजपाच्या मनोमिलनाचा फायदा भाजपाला संसदेत होणार आहे. शिवसेनेने विमा विधेयकाला विरोध दर्शवला होता. पण दोन्ही पक्षाचे मनोमिलन झाले तर शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देईल अशी शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभेत तीन तर लोकसभेत १८ खासदार आहे. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने या खासदारांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरु शकेल.