शिवसेनेचे भाजपाला अल्टिमेटम ?
By Admin | Updated: November 4, 2014 11:26 IST2014-11-04T11:24:20+5:302014-11-04T11:26:18+5:30
शिवसेनेच्या मंत्र्यांचा ७ किंवा ८ नोव्हेंबरला शपथविधी घ्या अन्यथा ९ नऊ नोव्हेंबरला विरोधी पक्ष नेता जाहीर करु असे अल्टिमेटम शिवसेनेने भाजपाला दिल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेचे भाजपाला अल्टिमेटम ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - शिवसेनेच्या मंत्र्यांचा ७ किंवा ८ नोव्हेंबरला शपथविधी घ्या अन्यथा ९ नोव्हेंबरला विरोधी पक्ष नेता जाहीर करु असा इशाराच शिवसेनेने भाजपाला दिल्याचे वृत्त आहे. यावर भाजपा काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा थाटामाटात पार पडला असला तरी अद्याप विधानसभेत भाजपाला बहुमत सिद्ध करायचे आहे यासाठी भाजपाला शिवसेनेची साथ महत्त्वाची ठरणार आहे. मात्र मंत्रिपदावर दोन्ही पक्षांमध्ये तणातणी सुरु आहे. शिवसेनेसमोर नमते न घेता त्यांना महत्त्वाती खाती देण्यास भाजपाने नकार दिला होता. अखेरीस मंगळवारी शिवसेनेनेही त्यांचा स्वाभिमान दाखवत भाजपाला अल्टिमेटम दिले आहे. यानुसार भाजपाने येत्या तीन ते चार दिवसांत शिवसेना नेत्यांचा शपथविधी केला नाही तर विरोधी पक्षात बसू अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे समजते.
दरम्यान, मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेनेचे सर्व आमदार लोणावळा येथील देवीच्या दर्शनाला गेले आहेत. यानंतर उद्धव ठाकरे आमदारांशी संवाद साधून भाजपाला पाठिंबा देण्याबाबत त्यांचे मत जाणून घेतील. यानंतर संध्याकाळी उशीरा शिवसेना भाजपाला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका जाहीर करेल असे सूत्रांनी सांगितले.