बेळगाव प्रश्नावरुन लोकसभेत शिवसेना - भाजप आमनेसामने
By Admin | Updated: July 30, 2014 13:41 IST2014-07-30T13:39:36+5:302014-07-30T13:41:35+5:30
बेळगावमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांच्या लाठीमाराच्या मुद्द्यावरुन बुधवारी लोकसभेत शिवसेना व कर्नाटकमधील खासदारांमध्ये चांगलीच जुंपली.
बेळगाव प्रश्नावरुन लोकसभेत शिवसेना - भाजप आमनेसामने
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - बेळगावमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांच्या लाठीमाराच्या मुद्द्यावरुन बुधवारी लोकसभेत शिवसेना व कर्नाटकमधील खासदारांमध्ये चांगलीच जुंपली. कर्नाटक सरकारविरोधात शिवसेना खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. तर बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य घटक असल्याचे कर्नाटकच्या भाजप खासदारांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितले.
येळ्ळूरमध्ये महाराष्ट्राच्या फलकावरुन कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानूष लाठीमार केला होता. या घटनेचे पडसाद बुधवारी लोकसभेतही उमटले. शिवसेना खासदारांनी कर्नाटक पोलिस हाय हायच्या घोषणा देत लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली. शिवसेना खासदारांच्या हातात कर्नाटक पोलिसांच्या लाठीमार करतानाचे छायाचित्रही होते. संतप्त शिवसेना खासदारांनी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले. यानंतर कर्नाटकमधील भाजप खासदारही समोर आले. दोन्ही पक्षाचे खासदार आमनेसामने आल्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यावर शून्यकाळात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी येळ्ळूरमधील कर्नाटकच्या दंडेलीचा प्रश्न सभागृहात मांडले. कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अत्याचार होत असून पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलही जखमी झाले. या मराठी भाषिकांना सुरक्षेची हमी द्या अशी मागणी सावंत यांनी केली. यावर कर्नाटकमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी प्रत्युत्तर दिले. 'बेळगाव सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. काही उपद्रवी मंडळींनी या भागात महाराष्ट्राचा फलक लावला व त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असे सांगत जोशी यांनी कर्नाटक पोलिसांची पाठराखण केली.