अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपाची मोट

By Admin | Updated: November 4, 2016 01:28 IST2016-11-04T01:28:50+5:302016-11-04T01:28:50+5:30

पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली

Shiv Sena-BJP alliance to help Ajit Pawar | अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपाची मोट

अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेना-भाजपाची मोट


पिंपरी : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा गट, तसेच शिवसेना, भाजपा व मनसेची मोट बांधून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
विधान परिषद निवडणुकीतील विलास लांडे यांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे. लांडे यांच्या उमेदवारीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा पाठिंबा असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. लांडे-जगताप ही जोडगोळी अजित पवार यांना शह देणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक आणि शिवसेना-भाजपातील सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
महापालिकेतील संख्याबळ ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८३, शिवसेना १४, काँग्रेसचे १३, भाजपाचे तीन, मनसेचे चार, अपक्ष दहा, आरपीआय गट एक असे एकूण १२८ नगरसेवक आहेत. त्यांपैकी जगताप गटाचे समर्थक २२, लांडे गटाचे समर्थक २० नगरसेवक आहेत. युती आणि आघाडीचा निर्णय काय होणार ? यावरही लढत अवलंबून असणार आहे. (प्रतिनिधी)
>बंडखोरी : वेगळी समीकरणे होणार
राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले यांनी लांडे यांची भोसरीत येऊन आज भेट घेतली. अर्ज माघारी घेऊन पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. तसेच, लांडे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट गुरुवारी भेट घेऊन शिवसेनेकडून पाठिंबा मिळविण्याची मागणी केली. लांडे यांनी थेट आढळरावांशी चर्चा केल्याने वेगळी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचीही लांडे यांनी भेट घेतली. शिवाय शहरातील अन्य नेत्यांच्या भेटीवर लांडे यांनी भर दिला आहे. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, पदाधिकारी, शिवसेना, भाजपा, मनसेची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या शनिवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर विधान परिषदेची लढत कशी असेल, हे सिद्ध होणार आहे.

Web Title: Shiv Sena-BJP alliance to help Ajit Pawar