शिवसेना-भाजप युती अखेर तुटली
By Admin | Updated: September 25, 2014 19:04 IST2014-09-25T18:52:00+5:302014-09-25T19:04:13+5:30
गेल्या २५ वर्षापासून महाराष्ट्रात असलेली शिवसेना-भाजपा युती अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून तुटली.

शिवसेना-भाजप युती अखेर तुटली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - गेल्या २५ वर्षापासून महाराष्ट्रात असलेली शिवसेना-भाजपा युती अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून तुटली. महायुतीत आलेल्या घटकपक्षांना न्याय न देवू शकल्याने आणि भाजपाला न्याय मिळत नसल्याने युती तोडण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाच्या पत्रकार परिषदेला भाजपाचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, घटकपक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. शिवसेना-भाजपा युती ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून तयार झाली होती. तर गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने चार-पाच घटकपक्षांना सोबत घेवून महायुती आकारास आली होती. परंतू २८८ जागामध्ये मित्रपक्षाला आणि भाजपाला योग्य जागा मिळत नसल्याने घटक पक्षांना न्याय देवू न शकल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. केंद्रीय नेतृत्व हे युती टिकवण्याच्या बाजुचे होते परंतू त्यांनी हा निणर्य कोअर कमिटीवर सोपविला त्यानंतर कोअर कमिटीने युती तोडण्याचा निर्णय घेतला असे सांगत विधानसभेच्या
निवडणुकीत भाजपा शिवसेनेवर कोणत्याही प्रकारे टीका करणार नाही. शिवसेनेने केलेल्या टीकेला उत्तर देण्याचे सुध्दा भाजपा टाळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीमध्ये आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी आणले होते त्यामुळे पंकजा मुंडे या जिथे असतील तिथे आपण राहिले पाहिजे असे सांगत आपण भाजपासोबत राहणार असल्याची माहिती रासपाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.