आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार - नारायण राणे
By Admin | Updated: November 23, 2014 14:20 IST2014-11-23T13:14:28+5:302014-11-23T14:20:05+5:30
सत्तेत न गेल्यास आमदार फुटतील अशी भिती शिवसेनेला वाटत असल्यानेच ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार - नारायण राणे
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. २३ - सत्तेत न गेल्यास आमदार फुटतील अशी भिती शिवसेनेला वाटत असल्यानेच ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेला मंत्रिपद हवे असले तरी त्यांच्याकडे मंत्रिपदाची गुणवत्ता असलेला एकही नेता नाही असे राणेंनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौ-यावर असून यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे फक्त पर्यटन आहे अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या कोकण दौराची खिल्ली उडवली. 'कोकणी माणसाने शिवसेनेला ताकद दिली मात्र शिवसेनेने कोकणी माणसाची फसवणूकच केली असून कोकणातील विकास प्रकल्पांना शिवसेनेचाच विरोध असतो असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिवसेना सत्तेसाठी लाचार असून ते दुस-यांना काय देणार असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.