सत्तारांच्या भूमिकेमुळं शिवसेनेत संताप; एकनाथ शिंदे, खैरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:00 PM2020-01-04T17:00:31+5:302020-01-04T17:01:22+5:30

शिंदे, राऊत आणि खैरे या तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून सत्तार यांच्याविषयी शिवसेनेत संताप असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Shiv Sena anger over Sattar's role | सत्तारांच्या भूमिकेमुळं शिवसेनेत संताप; एकनाथ शिंदे, खैरे आक्रमक

सत्तारांच्या भूमिकेमुळं शिवसेनेत संताप; एकनाथ शिंदे, खैरे आक्रमक

googlenewsNext

मुंबई - काँग्रेसमधून शिवसेनेते दाखल झालेल्या आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून घेतलेल्या भूमिकेमुळे  शिवसेनेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सत्तार यांची पुढील वाटचाल खडतर होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून सत्तार यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. तसेच महाविकास आघाडीला खिंडार पडत की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे सत्तार यांची समजूत काढण्यासाठी जालन्याहून अर्जुन खोतकर औरंगाबादेत दाखल झाले होते. मात्र जिल्ह्यातील एकही नेता सत्तारांकडे फिरकला नव्हता. खोतकरी यांना सत्तारांची समजूत काढण्यात यश आले असून सत्तार मातोश्रीवर जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

दरम्यान सत्तार यांच्याविषयी शिवसेनेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यासंदर्भात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले होते. त्यावर सत्तार यांच्या हालचालींवर त्यांनी संताप व्यक्त केला. सत्तार यांचा एकेरी उल्लेख करताना ते राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना गद्दार संबोधले असून उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सत्तार हे मुळचे शिवसैनिक नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेत रुळायला वेळ लागेल, असे सूचक वक्तव्य केले होते. शिंदे, राऊत आणि खैरे या तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून सत्तार यांच्याविषयी शिवसेनेत संताप असल्याचे स्पष्ट होत आहे. 
 

Web Title: Shiv Sena anger over Sattar's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.