संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क मोहीम - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: May 7, 2017 04:29 IST2017-05-07T02:46:23+5:302017-05-07T04:29:48+5:30
शिवसेना पक्ष संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना

संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क मोहीम - उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : शिवसेना पक्ष संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मोहिमेपूर्वी त्यांनी शनिवारी पत्नी रश्मी व पुत्र युवासेना प्रमुख आदित्य यांच्या समवेत लोणावळ्याजवळील कुलस्वामीनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. या वेळी देवीची विधिवत ओटी भरत देवीला सोन्याचा राणीहार व नथीचे अर्पण रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान ही पूर्णपणे संघटनात्मक बांधणी मोहीम आहे. या अभियानाविषयी काही गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र, या मोहिमेत शेतकरी वा जनता यांच्याशी संपर्क साधण्याबाबत अद्याप विचार केलेला नसून ग्रामीण भागात खेडोपाडी काम करणारे शिवसैनिक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत पक्ष बांधणी करण्यासाठी हे अभियान घेण्यात आले आहे.
या वेळी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खासदार श्रीरंग बारणे, मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सभागृहनेते यशवंत जाधव, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मडगी, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, भारत ठाकूर, बबन खरात, गणपत पडवळ, मधुकर पडवळ, अनिकेत घुले, नगरसेवक शादान चौधरी, सुनील इंगूळकर, नितीन आगरवाल, माणिक मराठे, विशाल हुलावळे उपस्थित होते.
आज मराठवाड्यात
जवळपास तीन ते चार वर्षांनी हे अभियान राबविण्यात आले असून रविवारी (दि. ७) मी याकरिता मराठवाड्यात जाणार आहे. ठाणे व मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर दोन्ही ठिकाणचे महापौर व उपमहापौर यांना घेऊन आज दर्शनाला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.