BCCIच्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा, पाकविरोधात घोषणा
By Admin | Updated: October 19, 2015 18:11 IST2015-10-19T11:00:09+5:302015-10-19T18:11:57+5:30
शिवसेनेचा पाकिस्तानविरोध तीव्र झाला असून आज सकाळी शेकडो शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खानविरोधात घोषणा दिल्या.

BCCIच्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा, पाकविरोधात घोषणा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - शिवसेनेची पाकिस्तान विरोधी भूमिका अधिक तीव्र झाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना विरोध दर्शवत शेकडो शिवसैनिकांनी आज सकाळी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून निदर्शने केली. 'पाकिस्तान मुर्दाबाद' , 'शहरयार चले जाव' असे फलक आणि काळे झेंडे फडकावत बीसीसीआयच्या कार्यालयात घुसलेल्या शिवसैनिकांनी भारत- पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान सेनेच्या या राड्यानंतर बीसीसीआय-पीसीबीची चर्चा रद्द झाली आहे.
पाकिस्तानमुळे आपले जवान शहीद होत असताना, त्यांच्या हल्ल्यामुळे देशातील निरपराधांचे प्राण जात असताना पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवता येणार नाही असे सांगत शिवसैनिकांनी शहरयार खान यांना विरोध केला आहे.
भारत व पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामन्यात येणा-या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय चीफ शशांक मनोहर व पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या दरम्यान आज बैठक होणार होती, त्यासाठी शहरयार खान मुंबईतही आले होते. मात्र याची कुणकुण लागताच शिवसैनिक वानखेडे मैदानातील शशांक मनोहर यांच्या कार्यालयात घुसले व पाकिस्तानविरोधी घोषणा देत जोरदार निदर्शने केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत १० शिवसैनिकांना अटक केली होती, त्यांना २००० रुपयाच्या जामीनावर कोर्टाने सोडले आहे.
यापूर्वी शिवसेनेने पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली खान यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता, त्यानंतर त्यांचा मुंबई व पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आला. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभालाही शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवत हा सोहळा आयोजित करणारे सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले होते. शिवसैनिकांच्या कृत्यावरून सर्व स्तरातून टीकेची झोड उठलेली असतानाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या भूमिकेचे समर्थन करत त्या शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.