शिर्डीत दर्शनव्यवस्था कोलमडली!
By Admin | Updated: January 2, 2015 01:26 IST2015-01-02T01:26:30+5:302015-01-02T01:26:30+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साई नगरीत तब्बल पाच लाख भाविकांनी हजेरी लावली. मात्र साईंच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे महिला भाविकांचे मात्र खूप हाल झाले.

शिर्डीत दर्शनव्यवस्था कोलमडली!
पाच लाख भाविक : नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रचंड हाल
शिर्डी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साई नगरीत तब्बल पाच लाख भाविकांनी हजेरी लावली. मात्र साईंच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे महिला भाविकांचे मात्र खूप हाल झाले. एकप्रकारे दर्शनव्यवस्थाच कोलमडल्याचे चित्र होते.
साईनामाच्या गजरात भाविकांनी नववर्षाचे स्वागत केले़ अधूनमधून येणारा पाऊस व थंडीमुळे भाविकांची तारांबळ उडाली. या प्रकाराने दर्शनबारीची गरज प्रकर्षाने समोर आली़ गर्दीमुळे शिर्डीतील पायाभूत सुविधा कोलमडून गेल्याचे चित्र होते. जुलै महिन्यातील नाशिकच्या सिंहस्थ पर्वणीच्या निमित्ताने गुरुवारच्या गर्दीपासून प्रशासनाने धडा घेण्याची गरज आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, खा. दिलीप गांधी, खा. राजन विचारे आदींनी साईदरबारी हजेरी लावली़
शुक्रवारी दर्शनरांगा अधूनमधून गावाबाहेरही गेल्या़ लाडू प्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रसादालय, बस सर्व्हीस, क्लोक रूम, उदी, वाटप, मुखदर्शन, द्वारकामाई मंदिर, चप्पल स्टॅन्ड व मोबाईल लॉकर्स नव्हे तर मंदिर परिसरातील एकुलत्या एक असलेल्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी सुद्धा रांगा लागल्या होत्या़ रांगेत मुलाबाळांसह तासनतास अडकलेले भाविक पाणी व स्वच्छतागृहाअभावी कासावीस झालेले दिसत होते़ त्यातही शंभरावर भाविकांनी साईदरबारी रक्तदान करून नववर्ष साजरे केले़
संस्थानने उभारलेल्या सुलभ स्वच्छतागृहात भाविकांकडून स्नानासाठी दोनऐवजी पाच रूपये आकारून थंड पाणी देण्यात आले.एवढ्या गर्दीतही दुसरा मजला बंद ठेवण्यात आला होता. शहरात वाहनतळांची वाणवा असल्याने आजूबाजूचा परिसर, रस्ते यांना अस्ताव्यस्त वाहनतळांचे स्वरूप आले़ पोलिसांच्या सतर्कतेने वाहतुकीची कोंडी झाली नसली तरी वाहतूक धिम्यागतीने सुरू होती़ प्रचंड गर्दीमुळे अनेक भाविकांनी मंदिर परिसरात लावण्यात आलेले मोठे एलएडी स्क्रीन, मंदिराचा कळस किंवा मुखदर्शन घेऊन समाधान मानले़ गुरूवारीपासूनच शिर्डीत भाविकांचा ओघ सुरू झाला़ रात्री बाराच्या ठोक्याला समाधीसमोर असण्याच्या भाविकांच्या अट्टाहासाने मंदिर व परिसर खचाखच भरला. भाविकांनी भजने गायिली, लेंडीबागेत हजारो दिवे लावले़ बाराच्या ठोक्याला भाविकांचा उत्साह भक्तिरसाने ओसंडून वाहत होता़ (प्रतिनिधी)
च्गर्दीत नेहमीप्रमाणेच पाकिटमारीही तेजीत होती़ पन्नास हजारांची देणगी देणाऱ्या एका भाविकाचे पाकीट चोरीस गेल्याने त्याला घरी जाण्यासाठीही पैसे उरले नाही. शेवटी देणगी कांऊटरवर जाऊन घरी जाण्यासाठी देणगीतील काही पैसे परत मिळवण्यासाठी तो विनवणी करत होता़
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले शनीदर्शन
गेल्या १३ वर्षांपासून अखंडपणे नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्या कुटुंबीयांसमवेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनी दर्शनासाठी दिला. मुख्यमंत्री चौहान यांनी सपत्नीक शनी अभिषेक केला.
शेगावात भाविकांची मांदियाळी
संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी एक लाखावर भाविकांनी शेगावमध्ये हजेरी लावली. अधूनमधून पावसाच्या सरी आणि गारठ्याचा कुठलाही परिणाम भाविकांवर दिसत नव्हता. दर्शनासाठी संस्थानतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.