शिंदे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी

By Admin | Updated: September 5, 2016 04:25 IST2016-09-05T04:25:50+5:302016-09-05T04:25:50+5:30

देशाच्या विविध पदांवर पोहोचलेले सुशीलकुमार शिंदे यांचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे

Shinde's struggling life is inspirational | शिंदे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी

शिंदे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी

शिवाजी सुरवसे,

सोलापूर- प्रतिकूल अशा आर्थिक, सामाजिक व भौगोलिक वातावरणात वाढलेले आणि देशाच्या विविध पदांवर पोहोचलेले सुशीलकुमार शिंदे यांचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले़
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी़ विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा़ शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, खा़ पी़ चिदंबरम, बिहारचे माजी राज्यपाल आणि सुशीलकुमार शिंदे अमृतमहोत्सवी समितीचे अध्यक्ष डी़वाय़ पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण, उज्ज्वलाताई शिंदे, खा़ ज्योतीरादित्य शिंदे, खा़ कुमारी शैलजा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़
आपल्या १० मिनिटांच्या भाषणात राष्ट्रपती मुखर्जी यांनी शिंदे यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला़ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असल्यापासून मी सुशीलकुमार यांना ओळखतो़ विशेषत: अर्थमंत्री असताना अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली़ स्वातंत्र्यानंतर सामाजिक विषमता, दारिद्र्य आणि निरक्षरता यावर मात करत आपला देश अज्ञानातून बाहेर पडला़ भारतीय लोकशाहीचे हे यश आहे़ आपण हे यश ताकदीने साजरे करूयात़
संघर्षमय जीवनातून शिंदे यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री तसेच लोकसभेचे नेते आदी विविध पदे भूषविली़ त्यांची संघर्षमय वाटचाल ही प्रत्येक भारतीयाची कथा आहे़ भारतामधील लाखो लोकांचे सुशीलकुमार शिंदे हे प्रेरणास्रोत आहेत़ प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो त्याप्रमाणे उज्ज्वलाताई यांचा शिंदे यांच्या यशस्वी जीवनात मोठा वाटा असल्याचे राष्ट्रपती म्हणाले़ आजच्या समारंभाला केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांसह अनेक मान्यवर आले आहेत. त्यातून हेच सिद्ध होते. ते निश्चित शंभरावा वाढदिवस साजरा करतील, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला़ कार्यक्रमाला राज्याचे सहकर व पणनमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, कृपाशंकरसिंह, सतेज पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, खा. सुप्रिया सुळे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. शरद बनसोडे, खा. हुसेन दलवाई, माजी खासदार मोहन बाबू, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, महापौर सुशीला आबुटे आदी उपस्थित होते.

Web Title: Shinde's struggling life is inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.