Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवी, असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटते. आजही आम्ही सुखदु:खाची विचारपूस करतो. अशावेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी व्यक्त केले होते. मात्र, या विधानावरून संजय शिरसाट यांनी युटर्न घेतला आहे.
वरिष्ठ फळीतील नेत्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते. कारण माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटते की आम्ही एकत्र आले पाहिजे. दोन्ही पक्षात अंतर वाढत आहे. ते वेळीच थांबविले नाही तर भविष्यात दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जातील. यामुळे आता जोडायची वेळ आहे . कारण आता दोन्ही पक्षांत एवढे अंतर नाही की ते एकत्र येऊ शकणार नाही. दोन शिवसेना होणे शिवसैनिकांना आवडले नाही. माझ्या मनाला यातना होतात. ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी भेटले की, त्यांच्या आणि आमच्या मनाची अवस्था अशीच असते. तू त्या पक्षात, मी ह्या पक्षात हे दोघांनाही पटत नाही. पण करावे काय? सत्तेमध्ये जाण्याचा धडपडीचा हा परिणाम झाला. संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले होते. यानंतर यावरून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता या विधानावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आला
माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आला. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी प्रयत्न करतो असे समजण्याचा काहीच कारण नाही. मी कोणता विद्वान आहे त्यांना सांगायला. मी काही वेगळे प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता. सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता. एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा राग होता, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, येणारी महापालिका निवडणूक झाल्यावर उद्धव ठाकरे कळेल की खूप मोठी चूक झाली आहे. पण आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाही. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा दिली. मी कितीही प्रयत्न केला तरी हे एकत्र येणार नाहीत. आता अशी अवस्था आहे की, काँग्रेस जी सत्तेत होती, त्यांचा साधा फोन यांना नाही. उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले होते. आम्ही ८ ते १० जण नाराज आहे, त्यांना जाऊ द्या, मात्र जेव्हा उठाव झाला, तेव्हा कळाले की हे ४० जण होते. त्यांच्याकडे एवढे रथी महारथी आहेत. त्यांच्याकडे विद्वानांची गँग आहे. ही उद्धव ठाकरे यांना सुधारायला देणार नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे.