शिंदे सरकारची शक्तिपरीक्षा सोमवारी; विशेष अधिवेशन लांबणीवर पाडण्याचे शिवसेनेचे प्रयत्न अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:03 AM2022-07-02T09:03:59+5:302022-07-02T09:04:42+5:30

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली होती. त्यानंतर २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

Shinde government's power test on Monday; Shiv Sena's attempt to postpone special session fails | शिंदे सरकारची शक्तिपरीक्षा सोमवारी; विशेष अधिवेशन लांबणीवर पाडण्याचे शिवसेनेचे प्रयत्न अपयशी

शिंदे सरकारची शक्तिपरीक्षा सोमवारी; विशेष अधिवेशन लांबणीवर पाडण्याचे शिवसेनेचे प्रयत्न अपयशी

Next

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारची शक्तिपरीक्षा ४ जुलै रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने  होणार आहे. तत्पूर्वी ३ जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. दरम्यान, शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर करत हे अधिवेशन लांबणीवर पाडण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी धक्का बसला.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली होती. त्यानंतर २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तथापि, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपने ॲड. राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे. २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला आणि त्याच रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सुरत गाठले. त्या नंतर हे आमदार गुवाहाटीला रवाना झाले. 

सध्या ते गोव्यात मुक्कामी आहेत. भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकार पाडले. आता नव्या सरकारची शक्तिपरीक्षा घेणाऱ्या रविवारपासूनच्या अधिवेशनात भाजप आणखी धक्का देवू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजपकडे अधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, त्यांच्या या त्यागाचा भाजपला अभिमान आहे असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्र परिषदेत सांगितले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत -
एका तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे ते सांगत आहेत; पण जे झाले ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सांगितले. अमित शहांनी दिलेला शब्द पाळला असता तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला वरून तो शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जात आहे, असा हल्लाबोलही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. 

आमच्यासोबत १७० आमदार : आपल्या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. माझ्यासोबत ५० आमदार (शिवसेना व अपक्ष) आहेत आणि भाजपचे संख्याबळ आता १२० आहे.     - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री  

शिवसेना नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटविले  -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून हटविण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतला. पण पक्षविरोधी कारवाया करीत आहात आणि शिवसेनेचे सदस्यत्व स्वतःहून सोडले आहे त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने मी आपणास नेते पदावरून हटवित आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम जाहीर -
विधानमंडळ सचिवालयाने दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर  केला आहे. त्यानुसार रविवारी ३ जुलै रोजी  सकाळी ११ ला सभागृहाचे कामकाज सुरू होईल. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मतास टाकण्यात येईल.  
विधान परिषदेत जशी सभापतींची निवड होते त्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. 
प्रत्येक उमेदवारासाठी प्रस्ताव दिलेले असतात ते प्रस्ताव विषय पत्रिकेवर दाखवले जातील व प्रत्येक प्रस्ताव पुकारला जाऊन आवाजी तसेच नियमानुसार उभे राहून मतविभागणी केली जाईल. 
ज्या उमेदवाराचा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल ते अध्यक्ष नियुक्त होतील. तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने बहुमताचा ठराव मंजूर करण्यात येईल.
 

Web Title: Shinde government's power test on Monday; Shiv Sena's attempt to postpone special session fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.