शिखरी काठ्यांच्या देवभेटीचा जल्लोष
By Admin | Updated: February 5, 2015 01:36 IST2015-02-05T01:36:08+5:302015-02-05T01:36:08+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत देवाच्या जयघोषात बुधवारी देवभेट उरकली.

शिखरी काठ्यांच्या देवभेटीचा जल्लोष
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत देवाच्या जयघोषात बुधवारी देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला नि पिवळ्या धम्मक भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता झाली.
सकाळी ९ वाजता संगमनेरकर होलम राजाच्या मानाच्या शिखर काठीने मुक्काम स्थळावर स.पो.नि. रामदास शेळके यांच्या हस्ते समाज आरती केल्यानंतर गडाकडे कूच केले. ऐतिहासिक छत्री मंदिर, होळकरांचा मान घेऊन मारुती मंदिरमार्गे महाद्वार पथावरून प्रासादिक शिखरी काठ्यासह मानाची ही काठी वाजतगाजत ११ वाजून ४५ मिनिटांनी गडावर पोहोचली. या वेळी संगमनेरहून आलेल्या सुमारे २० हजार भाविकांनी देवाचा जयघोष करीत भंडार-खोबऱ्याची उधळण केली. याच जयघोषात काठीने गडकोटातील मुख्य मंदिराच्या शिखराला स्पर्श करून देवभेट घेतली.
दुपारी साडेबारा वाजता सुपेकर खैरे यांच्या शिखर काठीने सातभाई वाड्यातून गडाकडे कूच केले. छत्री मंदिर, तसेच होळकरांचा मान स्वीकारून मारुती मंदिरामार्गे महाद्वार पथावरून वाजतगाजत मिरवणुकीने गडाकडे निघाली. सोबत स्थानिक होळकरांची शिखर काठी होतीच. मानाच्या या दोन्ही शिखरी काठ्यांसमवेत इतरही प्रासादिक काठ्या दुपारी दीडला गडावर पोहोचल्या. याही वेळी देवाचा जयघोष आणि भंडार-खोबऱ्याच्या उधळणीत काठ्यांची देवभेट झाली.
च्संगमनेरकर होलम, सुपेकर खैरे, आणि स्थानिक होळकर या मानाच्या ३ शिखरी काठ्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर ५०हून अधिक प्रासादिक शिखरी काठ्या कुलदैवताची माघ पौर्णिमेला वर्षातून एकदा देवभेट घेतात.