ज्ञानेश्वरी समजून सांगणार्या प्राचार्य शेवाळकरांची आठवण
By Admin | Updated: May 3, 2014 16:46 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T16:46:51+5:30
ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर हक्काने कुणाकडे जावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राम शेवाळकर.

ज्ञानेश्वरी समजून सांगणार्या प्राचार्य शेवाळकरांची आठवण
नानासाहेबांचा फोटो घ्यावा.
- प्राचार्य राम शेवाळकरांची आज पुण्यतिथी
नागपूर : ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर हक्काने कुणाकडे जावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राम शेवाळकर. मराठीचा अभ्यास करणारा विद्यार्थी असो वा तत्त्वज्ञानाचे संशोधन करणारा संशोधक. प्राचार्य राम शेवाळकर हसतमुखाने सार्यांचेच स्वागत करायचे. आता ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर काही लोक आहेत पण प्राचार्य शेवाळकर सांगायचे, तसे समजावून सांगणारे लोक नाहीत. त्यामुळेच नानासाहेबांची आठवण येते. ही आठवण केवळ त्यांच्या जयंती-पुण्यतिथीलाच येते असे नाही. पण या दिवशी ती अधिक प्रकर्षाने येते.
नानासाहेब म्हणजे सर्वच विचारधारेच्या लोकांना जवळचे आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व. नानासाहेबांनी प्रत्येक विचारधारेचा आदरच केला. एखाद्या विचारांवर आपली श्रद्धा असते आणि तोच विचार आपल्याला बरोबर वाटतो, हे स्वाभाविक घडते. याचा अर्थ भिन्न विचारांची माणसे चुकीचीच असतात, असे नव्हे. प्रत्येकाच्या श्रद्धा, तत्त्व, विचार वेगवेगळे असू शकतात पण ते समाजासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी असले पाहिजे. मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे, ते असले पाहिजेत पण मनभेद नको, हे तत्त्व नानासाहेबांनी आयुष्यभर पाळले. त्यामुळे त्यांच्याशी मनभेद असणारी माणसे सापडत नाहीत. अजातशत्रू म्हणून नानासाहेबांची ओळख होती. नानासाहेब असताना त्यांचे घर नेहमीच माणसांनी फुललेले असायचे. अनेकांच्या लिखाणाची प्रेरणा ते होते. नागपूरकरांना नानासाहेब म्हणजे नागपूरचे वैभव वाटायचे. त्यांच्या जाण्याने हे वैभव हरविले, याची खंत सर्वांनाच कायम आहे. नानासाहेबांविषयी अनेकांना कायम कुतुहल वाटायचे. एकीकडे ज्ञानेश्वरी, विनोबा आणि म. गांधी यांच्यावर भावपूर्ण विवेचन करणारे नानासाहेब स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही तितक्याच पोटतिडकीने बोलायचे. त्यांची व्याख्याने एखाद्या संशोधनापेक्षा कमी नव्हती. आज नानासाहेब नाहीत पण त्यांचा मुलगा आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्या व्याख्यानाचे काही संग्रह काढले आहेत. सीडीजही आहेत. यामुळे देहरूपाने नानासाहेब नसले तरी त्यांची व्याख्याने, त्यांचा आवाज त्यांच्या चाहत्यांपर्यत पोहोचतो आहे. प्रत्येक मोठा माणूस आपल्याला हवाच असतो. पण काही बाबी मानवी मर्यादांच्या पलीकडे असतात. येणारा माणूस कधीतरी जाणार असतो. हे शाश्वत सत्य नाकारता येत नाही. नानासाहेबही अनंत आठवणींचा पट ठेवून गेले. पण त्यांच्याबाबतीत हे सत्य स्वीकारणे आजही जड जाते, हे निश्चित!