शेट्टींची आत्मक्लेश यात्रा? ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!
By Admin | Updated: June 30, 2017 18:02 IST2017-06-30T18:02:14+5:302017-06-30T18:02:14+5:30
खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हती.

शेट्टींची आत्मक्लेश यात्रा? ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!
ऑनलाइन लोकमत
कराड, दि. 30 - खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हती. ती तर मला त्रास देण्यासाठी काढलेली सदाभाऊ क्लेश यात्रा होती, असा टोला राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लगावला.
कराड येथे आढावा बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्री खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. मंत्री खोत म्हणाले, खरं तर चळवळीत योगदान नसणाऱ्या लोकांनी शेतकरी संघटनेतील वातावरण गढूळ केले आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये सहभागी असल्याने मी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पण काहींच्या मते मी त्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करायला हवे. तसे मी करीत नसल्याने ते नाराज आहेत. त्याला मी काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी खासदार शेट्टी यांना मारली.
नुकतीच पुणे येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत तुमच्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. तुम्हाला 4 जुलैपर्यंत मत मांडण्याचा अल्टिमेटम दिलाय, असे छेडले असता खोत म्हणाले, ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. पण मी संघटनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याने मला बैठकीला बोलविले नसेल. मी उत्तर द्यायला, मत मांडायला तयार आहे. समितीचे लोक माझ्याकडे आले तर ठीक. नाही तर ते बोलवतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहे.
मी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करीत असल्याने मी गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे मला चौकटीत राहुनच काम करावे लागते. मी शरद जोशींच्या विचारसरणीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे कृषीमंत्री म्हणून काम करताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. ऊस खरेदी कर माफ करणे, बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्याला मतदानाचा हक्क देणे अशा अनेक निर्णयाबरोबर शेतकरी कर्जमाफीमध्ये मी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळे विरोधक काहीही टिका करीत असले तरी त्याला मी महत्व देत नाही. विदर्भ मराठवाड्यात पाऊस नाही. तेथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. याबाबत विचारले असता खोत म्हणाले, त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील.
कराडला आठ दिवसांत नवा मुख्याधिकारी
कराडच्या मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्यातील संघर्षाबाबत विचारले असता, मी स्वत: यामध्ये लक्ष घातले आहे. कराडला येत्या आठ दिवसात नवा आणि चांगला मुख्याधिकारी रूजू होईल, असे मंत्री खोत यांनी यावेळी सांगितले.