शेट्टी-खोत यांच्यातील ‘स्वाभिमान’ चिघळला
By Admin | Updated: March 4, 2017 05:18 IST2017-03-04T05:18:11+5:302017-03-04T05:18:11+5:30
राजू शेट्टी आणि कृषि-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधे ‘स्वाभिमाना’ची मोठी भिंतच उभी राहिल्याचे शुक्रवारी दिसून आले

शेट्टी-खोत यांच्यातील ‘स्वाभिमान’ चिघळला
पुणे : ‘माझा दोस्त’अशी एकमेकांना आपुलकीची हाक मारणारे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कृषि-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधे ‘स्वाभिमाना’ची मोठी भिंतच उभी राहिल्याचे शुक्रवारी दिसून आले. शेट्टी नवीन शासकीय विश्रामगृहात उतरल्याचे समजल्यावर तेथे आलेल्या खोत यांनी आपला मोर्चा पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहाकडे वळविला व तेथेच मुक्काम करणे पसंद केले.
सदाभाऊ ंना लाल दिवा मिळाल्यापासून दोघांमध्ये सुरू झालेला दुरावा कमी होण्याऐवजी अजूनही धुमसतोयच, हेच यावरुन स्पष्ट झाले. या विसंवादीपणामुळे स्वाभिमानीची शकले होणार की, काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याच्या जलावरण सोहळ््यापासून सुरु झालेले दोघांमधील खटके वाढतच आहेत. खोत यांच्या मुलाच्या लग्नात झालेला खर्चावर नाक मुरडणे सुरू असतानाच शेट्टींचा सल्ला धुडकावत सदाभाऊंनी मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत उतरविले. त्यानंतर दोघांमधील ताण आणखी वाढला. त्यातच निकालानंतर शेट्टींनी विरोधात काम केल्यामुळेच सदाभाऊंच्या मुलाचा पराभव झाल्याची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर दोघांमधील वाक्युद्धही चांगलेच रंगले. शेट्टींनी...तुमचे अस्तित्व कुणामुळे आहे, हे बजावले. तर सदाभाऊंनी गोफण बाहेर काढली. तेव्हापासून दोन दिशेला झालेली या दोघांची तोंडे एकमेकांसमोर येण्याचे टाळतच आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लढलेल्या कार्यकर्त्यांशी शेट्टी यांनी शुक्रवारी संवाद साधला. त्यासाठी ते पहाटे तीन वाजता कॅम्प येथील नवीन शासकीय विश्रामगृहात उतरले होते. याची माहिती कळताच खोत यांनी शासकीय विश्रामगृहावर जाणे टाळले. वास्तविक येथेच त्यांनी सदनिकाही आरक्षित केली होती. मात्र, त्या ऐवजी पाणी पुरवठा विभागाच्या विश्रामगृहावर जाऊन त्यांनी विश्रांती घेतली. याबाबत विचारले असता, आमच्यात फार अंतर नाही, असे खोत यांनी सांगितले. मात्र,याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. आमच्यात किती अंतर आहे, हे किलोमीटरच्या मोजपट्टीत मोजले नसल्याचेही सदाभाऊ त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>कदाचित पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागा कमी पडू नये, या साठी बहुदा ते कार्यक्रमाला आले नसावेत. त्यांचा आजचा कार्यक्रम मला माहीत नव्हता. ते आमच्या पक्षाचे मंत्री आहेत. राज्याच्या महत्त्वाच्या बैठका असल्याने त्यांना तेथेही असणे गरजेचे होते. निवडणुकानंतर ते चार-पाच दिवस देशाबाहेर गेले होते. त्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र, आमचे बोलणे होत असते, आम्ही लवकरच भेटू.
- खा. राजू शेट्टी, अध्यक्ष- स्वाभीमानी शेतकरी संघटना