शेलारांचे विधान हास्यास्पद - अहिर
By Admin | Updated: September 20, 2016 04:20 IST2016-09-20T04:20:34+5:302016-09-20T04:20:34+5:30
मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शरद पवार राजकारणात आहेत.

शेलारांचे विधान हास्यास्पद - अहिर
मुंबई : मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शरद पवार राजकारणात आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाबाबत पवारांनी केलेल्या भाष्यावर शेलारांसारख्या कालच्या नेत्यांनी प्रतिक्रीया देणे हास्यास्पद आहे. आपण कुणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याबाबात शेलारांनी तारतम्य बाळगायला हवे, अशी टीका राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.
शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा सोमवारी मुंबई राष्ट्रवादीने तीव्र निषेध केला. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या प्रतिमेचे दहन केले. शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. पवारांसारख्या मार्गदर्शक नेतृत्वावर शेलारांसारख्या गल्लीबोळातील नेत्यांनी केलेल्या टीकेकडे खरे तर दुर्लक्ष करणेच योग्य आहे. शरद पवारांबद्दल देशभरातील मान्यवर आणि ज्येष्ठ नेते आदराने बोलतात. खुद्द भाजपाचेच वरिष्ठ नेते शरद पवारांकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात. त्यामुळे शेलारांच्या या वक्तव्याबाबत भाजप नेतृत्वानेच त्यांना योग्य ती समज द्यावी. अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य वेळी समज देतील, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यास उत्तर देताना, या समाजातील अस्वस्थतेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांवर चर्चेची दारे खुली केली आहेत. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी यात राजकीय लुडबुड करू नये, असा शेरा शेलार यांनी मारला होता. (प्रतिनिधी)