शीना बोराचे ‘आरुषी’ होऊ देणार नाही
By Admin | Updated: September 7, 2015 02:15 IST2015-09-07T02:15:56+5:302015-09-07T02:15:56+5:30
शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळे त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली.

शीना बोराचे ‘आरुषी’ होऊ देणार नाही
मुंबई : शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळे त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ३० सप्टेंबरपर्यंत या खुनाचा पूर्ण उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न असून, निर्धारित वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल, असे पोलीस दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
शीनाच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व सध्या अटकेत असलेली तिची आई आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि नात्याच्या गुंतागुंतीमुळे खुनाचे गूढ वाढत चालले आहे. ही केस आता मुंबई पोलिसांसाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. ही घटना तीन वर्षांपूर्वीची असल्याने पुरावे गोळा करण्यात काही अडचणी येत आहेत. मात्र या प्रकरणाचे महत्त्व ओळखून गेल्या दीड महिन्यापासून तपास अधिकारी प्रयत्नाची शिकस्त करून सर्व आवश्यक बाबींचा उलगडा करत आहेत. त्यामुळे या हत्येच्या तपासाचा शेवट आरुषी तलवार हत्याकांडाप्रमाणे होणार नाही, याची खात्री पोलिसांना आहे.
मीडियाचा अतिरेक
मीडिया पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत आहे. न्यूज चॅनेल्स आरोपीला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे पुरावे गोळा करण्यात आणि तपासात आम्हाला अडथळे निर्माण होत असल्याबाबत पोलिसांतील उच्चपदस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोपपत्र दाखल करायला तीन महिन्यांचा अवधी असतो. मीडियाला मात्र १० दिवसांत ते सर्व हवे आहे, असा या अधिकाऱ्यांचा सूर आहे.