प्रियकरासाठी तिने चोरली दुचाकी
By Admin | Updated: June 5, 2017 19:50 IST2017-06-05T19:50:32+5:302017-06-05T19:50:32+5:30
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते, असे म्हणतात. प्रेमात आकंठ बुडालेले कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो

प्रियकरासाठी तिने चोरली दुचाकी
>सुरेंद्र राऊत / ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 5 - प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते, असे म्हणतात. प्रेमात आकंठ बुडालेले कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो, असाच प्रत्यय यवतमाळात आला असून एका तरुणीने आपल्या प्रियकरासाठी चक्क दुचाकी चोरली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून तरुणी मात्र अल्पवयीन आहे.
यवतमाळच्या जिजाऊनगर परिसरातील एका अल्पवयीन तरुणीचे मार्इंदे चौक परिसरातील वट्या उर्फ वैभव गजानन जिरकर (१८) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. वट्या हा पोलीस दप्तरी सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता वट्यासाठी त्याच्या प्रेयसीने जिजाऊनगरातील विजय ढेरे यांची दुचाकी (क्र.एम.एच-२९-एक्स-६९१९) चोरली. त्यानंतर ढेरे यांनी दुचाकी चोरी गेल्याची माहिती आपल्या मित्रांना सांगितली. सर्वांनी शोध सुरू केला.
दरम्यान ११.३० वाजता संदीप टॉकीज चौकात ही दुचाकी घेऊन एक तरुणी आढळली. तिला दुचाकीसह शहर ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या तरुणीने सायंकाळी संपूर्ण हकीकत सांगितली. या प्रकरणी विजय ढेरे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांवरही चोरीचा गुन्हा दाखल केला. वट्याला अटक करण्यात आली. या अजब प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली.