‘ती’ हत्या आॅनर किलिंगच!
By Admin | Updated: November 7, 2014 04:06 IST2014-11-07T04:06:52+5:302014-11-07T04:06:52+5:30
माहूर येथील रामगड किल्ल्यावर प्रेमी युगुलाची झालेली हत्या आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचे पुढे आले

‘ती’ हत्या आॅनर किलिंगच!
पुसद (जि़ यवतमाळ)/माहूर (जि़ नांदेड) : माहूर येथील रामगड किल्ल्यावर प्रेमी युगुलाची झालेली हत्या आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचे पुढे आले असून, नांदेड पोलिसांनी मुलीचे वडील, चुलता, चुलत भावासह दोन मध्यस्थांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ११ झाली आहे.
वडील मिर्झा खालिद बेग कमर बेग (४८), काका नबाब जानी कमर बेग (५५), चुलत भाऊ विकार अहेमद नबाब जानी बेग (२८) आणि मध्यस्थ अभियंता कंत्राटदार सैयद अन्वर अली सत्तार अली (४४), कैसर मिर्झा बहद्दूर मिर्झा (४४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी सायंकाळी नांदेड पोलिसांनी अटक केली. तर यापूर्वी सुपारी घेणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुलीचे वडील, काका, चुलत भाऊ आरोपी निष्पन्न झाल्याने हा प्रकार आॅनर किलिंगचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी निलोफर खालिद बेग आणि तिचा प्रियकर शाहरूख फिरोज खान पठाण या दोघांची १० सप्टेंबर रोजी माहूर येथील रामगड किल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्ती दरवाजाजवळ या दोघांचेही प्रेत आढळले होते.
आरोपींचा शोध लागत नसल्याने नांदेड पोलीस अधीक्षकांनी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. त्यानंतर तब्बल दीड महिन्याने २८ आॅक्टोबर रोजी पोलिसांनी राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर, शेख जावेद उर्फ पेंटर शेख हुसेन, रंगराव श्यामराव बाबटकर, शेषराव उर्फ पिंटू श्यामराव बाबटकर, कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे यांना अटक केली होती. तर मुख्य सूत्रधार रघुनाथ उर्फ रघू डॉन उर्फ रघू रोकडा नाना पळसकर याला २ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. सर्व आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर साहित्यही काढून दिले होते. त्यावरून पोलिसांनी सुपारी देणाऱ्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, सैयद अन्वर अली आणि कैसर मिर्झा यांना संशयावरून ताब्यात घेतले. परंतु या हत्याकांडाचे गूढ उकलत नव्हते. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच या हत्याकांडाचे गूढ उकलले. बदनामीच्या भीतीतून वडील, काका व चुलत भावाने कट रचून सुपारी देऊन निलोफर आणि शाहरूखचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या वडिलांसह पाच आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात असताना न्यायालयाने सर्वांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (वार्ताहर)