मुंबई - महाराष्ट्र कॅडरमधील आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अवैध उत्खननाविरोधात केलेल्या कारवाईवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कॉल केला. या कॉलवर अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. मूळच्या केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात त्यांचे बालपण गेले. माझी मुलगी स्वभावाने शांत आणि हसतमुख चेहऱ्याची आहे असं तिचे वडील म्हणाले.
आयपीएसचे वडील वीआर राजू म्हणाले की, माझ्या मुलीला उत्खनानाबाबत खूप काही माहिती आहे. मुक्कुन्निमाला येथे अनेक वर्ष अवैध उत्खनन होत होते. तिथून आमचे घर दीड किलोमीटर अंतरावर होते. ती अशी मुलगी आहे जे सर्व काही पाहत मोठी झालीय. त्यामुळे ती या गुन्ह्याविरोधात उभी आहे असं त्यांनी सांगितले. तिरुवनंतपुरमच्या विलावूरकल गावातील अंजना कृष्णा पहिली आयपीएस अधिकारी आहे. त्यांचे वडील बांधकाम क्षेत्रात ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांची विटा बनवण्याची फॅक्टरी आहे तर आई तिरुवनंतपुरम येथील जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात. छोटा भाऊ अर्जुन मेडिकलचं शिक्षण घेतो.
अंजना कृष्णा या परिसरातील पहिली यशस्वी महिला अधिकारी आहे. आम्ही एक सामान्य जीवन जगतो. ती खूप धाडसी, साधी आणि प्रामाणिक जीवनावर विश्वास ठेवते. तिला कुणालाही त्रास देणे अथवा इजा पोहचण्याची सवय नाही. अजित पवारांसोबत घडलेल्या घटनेनंतरही अंजना कृष्णा खूप शांत आणि आनंदी राहिली. ती कधीही आमच्याजवळ कामाबद्दल काही बोलत नाही. आम्हाला आनंद आहे, या घटनेनंतरही माझ्या मुलीबाबत कुणी वाईट बोलत नाही. ही बातमी चर्चेत आल्यानंतर माझे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील बऱ्याच लोकांचे फोन आले. प्रत्येक जण माझ्या मुलीबाबत गर्वाने बोलत होते असं वडील वीआर विजू यांनी सांगितले.
काय घडला प्रकार?
अजित पवारांनी सोलापूरातील एका स्थानिक कार्यकर्त्यांच्या फोनवरून विभागीय पोलीस आयुक्त अंजना कृष्णा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. एका गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले. मात्र अजित पवारांचा आवाज न ओळखत त्यांनी तुम्ही माझ्या फोनवर फोन करा असं सांगितले. त्यानंतर संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत महिला अधिकाऱ्याला खडसावले.