शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत
By Admin | Updated: November 18, 2014 16:08 IST2014-11-18T11:49:43+5:302014-11-18T16:08:44+5:30
राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत
ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. १८ - राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे. भाजपा सरकार स्थिर राहावे यासाठी राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचे त्यांनी नमूद केले असून राजकारणाची उत्तम जाण असलेल्या पवारांच्या या भाकिताने महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटून आले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबाग येथे चिंतन शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये शरद पवार यांनी उपस्थित पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचे चित्र निर्माण केले आणि विरोधकांनी त्याचा फायदा घेतला असे सांगत पवारांनी पराभवासाठी काँग्रेसच्या दिशेने बोट दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्कात वाढवण्या अपयशी ठरली असून आपण आणखी कुठे कमी पडलो हेदेखील तपासून बघायला हवे असे त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिल्याचा दावाही पवारांनी केला. राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या घटकांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याची गरज असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीद्वारे महाराष्ट्रात पाय रोवणा-या एमआयएमला भाजपामधील एका गटाने पाठिंबा दिल्याचा आरोपही पवार यांनी केला. या पक्षाच्या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे पाहता राज्यातील एकोप्याला धोका निर्माण होवू शकतो असे पवारांनी सांगितले.
भाजपा सरकारमध्ये धाडस नाही
भाजपा आणि शिवसेना युती झाली असती तर पुढील पाच वर्ष एकत्र आले तर सरकार स्थिर झाले असते. पण तसे झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनही सरकार स्थापन झाले नसते. म्हणून भाजपाला पाठिंबा दिला. पण ही स्थिती दिर्घकालीन स्थिरता देणारी नाही. आम्ही दिलेला पाठिंबा स्वीकारण्याचे धाडसही या सरकारमध्ये नाही असा टोलाही त्यांनी लगावला.