मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केले. शरद पवार गटाच्या वर्धापन दिनानिमित्त घाटकोपर येथे पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी आयोजित केलेल्या संकल्प शिबिरात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. या शिबिराला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, आपल्याला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले पण ती स्थिती विधानसभेला राहिली नाही, याचे कारण सांगणे अवघड आहे. पण निवडणूक यंत्रणेच्या संबंधी लोकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. याबाबत राहुल गांधी यांनीही एक लेख लिहिला आहे. हा निकाल आपल्यालासुद्धा अस्वस्थ करणारा होता.
‘एकत्र विचार करा’आपल्याला महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्या-त्या शहरात, त्या-त्या जिल्ह्यातील सहकाऱ्यांनी एकत्र बसावे आणि निवडणुकीला एकट्याने सामोरे जायचे की समविचारी पक्षांबरोबर जायचे याचा निर्णय घ्यावा, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्याचे अधिकार पक्षाने स्थानिक स्तरावर दिले असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
‘युद्धाबाबत भारताची तटस्थ भूमिका दुर्दैवी’ इस्रायल-इराण युद्धात जे हल्ले झाले त्यात सामान्य लोक मृत्युमुखी पडले, हे सगळे होत असताना जगातील अनेक देश स्वस्थ राहिले. भारत हा मानवतेचे रक्षण करणारा अशी आपली ओळख पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि नंतरच्या कालखंडात नेहमीच राहिली. मात्र, निरपराध लोक उद्ध्वस्त होत असताना कालच संयुक्त राष्ट्रात याबाबतचा प्रस्ताव आला आणि भारताने अतिरेक्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची गरज असताना तटस्थता स्वीकारली, हे भारताचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या जागतिक नीतीवर टीका केली.
हजारो कोटी रुपये जातात कुठे?: जयंत पाटीलमुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने घटत आहेत. पैसा तर कमी होत आहे, पण शहरात नेमके नवीन काय उभे राहतेय, हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. वाहतूककोंडी होते. पाणी साचते. पाण्याची समस्या आहेच, मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली असल्याने आपल्या वॉर्डमध्ये कसून तयारीला लागा, असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पारदर्शीपणे आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे लोकं नक्कीच उभे राहतात, असेही ते म्हणाले.