शरद पवार घेणार नगरसेवकांची शाळा
By Admin | Updated: March 2, 2017 03:42 IST2017-03-02T03:42:19+5:302017-03-02T03:42:19+5:30
शिवसेना-भाजपाचे वादळ वाहत असतानादेखील त्या वादळातून ठाण्यात मात्र राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला

शरद पवार घेणार नगरसेवकांची शाळा
ठाणे : मुंबईसह राज्यात एकीकडे शिवसेना-भाजपाचे वादळ वाहत असतानादेखील त्या वादळातून ठाण्यात मात्र राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे कौतुक करण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांवर वचक कशा पद्धतीने ठेवता येईल, यासाठी कानमंत्र देण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे ठाण्यात पुन्हा हजेरी लावणार आहेत. येत्या ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ते या नगरसेवकांची शाळा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता मिळाली असून त्यांनी ६७ जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, मुंबई, ठाणे आणि राज्यातही भाजपाला पोषक असे वातावरण होते. त्यामुळे इतर महापालिकांमध्ये भाजपाने ज्या पद्धतीने मुसंडी मारली, तशीच ठाण्यातही मारली जाईल, अशी हवाच निर्माण झाली होती. परंतु, भाजपाला पोषक असलेल्या राजकीय वातावरणातही ठाण्यात राष्ट्रवादीने ३५ जागांवर यश संपादित केले आहे. त्यामुळे या सर्वांचे कौतुक करण्यासाठी शरद पवार आता ठाण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेत आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सत्ताधाऱ्यांच्या एक कलमी कार्यक्रमाला अंकुश कसा घालायचा, यावरदेखील ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, पुढील पाच वर्षे कशा पद्धतीने काम करायचे, यावरदेखील ते भाष्य करणार असल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यात निवडणुकीच्या काळात जी काही गटबाजी उफाळली होती, त्या गटबाजीचाही समाचार घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. निवडणुकीच्या काळात कळव्यात आव्हाड विरुद्ध गणेश नाईक गट यामध्ये काही जागांवरून वितुष्ट निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
>नाईक, डावखरे गट मागे
निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारातूनदेखील नाईक आणि डावखरे गट पिछाडीवर होते. एकत्रितपणे काम केले असते, तर आणखी काही जागा वाढल्या असत्या, असाही मुद्दा रंगला. त्यामुळे यावरदेखील ते भाष्य करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.