अणूकराराला विरोध करणा-या सेनेला शरद पवारांनी हाणला टोला
By Admin | Updated: April 11, 2015 18:51 IST2015-04-11T18:29:46+5:302015-04-11T18:51:27+5:30
जैतापूरचा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगत सत्तेत असताना सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणं चुकीचं आहे, असा टोला शरद पवारांनी शिवसेनेला हाणला.

अणूकराराला विरोध करणा-या सेनेला शरद पवारांनी हाणला टोला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - जैतापूरच्या प्रकल्पाला सत्ताधारी शिवसेनेचा विरोध कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच सत्तेत असताना सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणं चुकीचं असल्याचे सांगत त्यांनी शिवेसेनेला टोला हाणला आहे.
तारापूर वीज केंद्रामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोचली नाही, उलट राज्याला स्वस्त मिळत असल्याचे उदाहरण देत जैतापूर प्रकल्पामुळेही पर्यावरणाला कुठलीही हानी पोचणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात भाजपा- सेनेचे युतीचे सरकार असल्याने भाजपाने शिवसेनेला समजावून सांगायला हवे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जैतापूर प्रकल्पाला कोणीही विरोध करण्याची गरज नसल्याचे सांगत शिवसेनेला टोला लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवून आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.