शरद पवारांनी घेतली कोपर्डीतील पीडित कुटुंबाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 12:50 IST2016-07-31T12:50:30+5:302016-07-31T12:50:30+5:30
कोपर्डी येथील पीडित मुलीच्या बहिणीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आपण घेत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोपर्डीत जाहीर केले.

शरद पवारांनी घेतली कोपर्डीतील पीडित कुटुंबाची भेट
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ३१ - कोपर्डी येथील पीडित मुलीच्या बहिणीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आपण घेत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोपर्डीत जाहीर केले. समाजात तेढ निर्माण न करता गावकऱ्यांनी शांतता बाळगली, त्याबद्दल आपण त्यांना सलाम करतो, असेही पवार म्हणाले.
कोपर्डी येथील पीडित कुटुंबीयांची पवार यांनी आज सकाळी भेट घेतली. यानंतर गावकऱ्यांशी बोलताना ते म्हणाले, अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटनांना जरब बसेल. नवीन कायदा करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे आहे त्या प्रचलित कायद्यानुसार आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव नागवडे, आ. राहुल जगताप, आ. अरुण जगताप, जि.प. अध्यक्षा मंजुषा गुंड होते. कोपर्डीत भेट दिल्यानंतर पवार भांबोरा गावाकडे रवाना झाले आहेत. तेथेही मुलीच्या छेडछाडीच्या व विनयभंगाच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे.