Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तावर कठोर कारवाई करत या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी जनभावना होती. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या मोहिमेची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. देशभरातील सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया येत असून, या कारवाईचे समर्थन केले जात आहे.
पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. या बैठकीमध्ये पीएम मोदी यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईची माहिती दिली. सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याचे कौतुक केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनावर जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या कारवाईची माहिती दिली. ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला.
सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली
शरद पवारांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. शरद पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑपरेशन 'सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.