महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ, पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात- शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:32 IST2017-10-10T03:32:06+5:302017-10-10T03:32:15+5:30
महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ आहे. पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. देशात अन्य कोणत्याच राज्यात ही परंपरा पाहायला मिळत नाही.

महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ, पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात- शरद पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ आहे. पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. देशात अन्य कोणत्याच राज्यात ही परंपरा पाहायला मिळत नाही. संसदेतही असे चित्र दिसत नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत लोकांचे राज्य आहे. राजकीय विरोधातही व्यक्तिगत सलोखा जपला जातो, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेणाºया ‘समग्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा
सोहळा सोमवारी रवींद्र नाट्यमंदिरात झाला. शिवसेना वगळता सर्वच राजकीत पक्षांच्या दिग्गजांनी लावलेली हजेरी, उपस्थित
नेत्यांच्या राजकीय कोपरखळ््या, मिश्किल शेरेबाजीत तटकरे
यांच्या राजकीय वाटचालीच्या कौतुकाचा हृदय सोहळा राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला. पवार कुटुंबीयांचे राजकारणातील विरोधक म्हणून ओळखले जाणारे मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत व्यासपीठावर उपस्थित होते.
एरवी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय टोमणे मारणारे शरद पवार सोमवारी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले होते. तर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामध्ये ‘एनडीए’त सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे हास्यविनोदात रंगल्याचे चित्र होते.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात तटकरेंचे कट्टर स्पर्धक शेकापचे जयंत पाटील यांनीही कोपरखळ््या मारत तटकरेंना शुभेच्छा दिल्या. जातीचे संख्याबळ सोबत नसतानाही, ताकदवान नेत्यांची परंपरा असणाºया रायगड जिल्'ात तटकरे यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. एका लहान कुटुंबातून पुढे येऊन जिल्ह्यातील लोकांच्या मनावर राज्य केले. यातच त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती मिळते. तटकरे यांच्या कौतुकासाठी जमलेल्या विविध पक्षातील नेत्यांमुळे हे व्यासपीठ राज्याच्या सुसंस्कृतपणाचे आणि सलोख्याचे प्रतिक वाटत असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री कार्यक्रमाला अनुपस्थित
प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.
सुशीलकुमारांची
धमाल बॅटिंग
रोषाला विसरून चालत नाही. माझी तर ती सासुरवाडी आहे, असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या खुमासदार भाषणाला सुरुवात केली. शरद पवारांना माणसे न्याहाळण्याचा नाद आहे. कर्तृत्ववान, धडपडणाºया तरुण मंडळींना हेरतात आणि त्यांना पुढे नेतात. आम्ही सगळे तसे काँग्रेसवालेच पण आता मी एकटाच आहे, असे शिंदे म्हणताच शरद पवारांसह सर्वांनाच हसू आवरता आले नाही. नारायण राणे आता तिकडे गेले तरी फरक पडत नाही. वैयक्तिक संबंध तसेच आहेत, असे सांगतानाच कोकणी माणूस चाणाक्ष असतो, असे शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
राजकीय टोले-प्रतिटोले
शरद पवारांनी तटकरेंना खासदारकी द्यावी. तटकरेंची ‘ब्याद’ दिल्लीला गेली की, आम्ही जिल्ह्यात मोकळे, असे शेकापचे नेते जयंत पाटील म्हणाले. त्यावर, स्वत:ची सोय लावण्यासाठी तटकरेंना दिल्लीला पाठवायला सांगितले. पण, शरदराव सगळंच ऐकतील असे समजू नका जयंतराव. कुणाला कधी आणि कसे ओढावे? हे शरद पवारांना चांगले कळते, अशी शेरेबाजी सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
चौफेर दृष्टी अन् लग्न...
पवारांना माणसे न्याहाळण्याचा छंद असल्याचे सुशीलकुमार म्हणाले. त्यावर, राजकारणात न्याहाळणं, निवडणं हे काम सगळेच करतात. शिंदे पोलीस खात्यात होते. त्यामुळे न बोलता चौफेर दृष्टी ठेवण्याची त्यांची जुनी सवय. ती आमच्याकडे नव्हती म्हणून आमचं लग्न घरच्यांनी जुळवलं. शिंदे यांनी मात्र चौफेर दृष्टी ठेवली, असे उत्तर पवार यांनी देताच सुशीलकुमार शिंदे यांनाही हसू आवरता आले नाही.
अंजली दमानिया यांची निदर्शने-
तटकरेंच्या कार्यक्रमाला फडणवीस येणार म्हणून सभागृहाबाहेर ‘आप’च्या अंजली दमानिया यांनी निदर्शने केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद केले होते. त्यावरून दमानिया यांनी सोशल मीडियातून टीका केली होती.