‘मोदींपेक्षा शरद पवारांना शेतीची अधिक जाण’
By Admin | Updated: April 23, 2017 02:08 IST2017-04-23T02:08:01+5:302017-04-23T02:08:01+5:30
शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
‘मोदींपेक्षा शरद पवारांना शेतीची अधिक जाण’
पुणे : शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जास्त कळतात, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. शेट्टी यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पवारांच्या विरोधात थेट बारामतीत आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय परिवर्तन परिषदेचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. या परिषदेत तरूणांनी राजकारणात यावे का, या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राजू शेट्टी यांची भूषण राऊत यांनी मुलाखत घेतली़ त्यावेळी शेतीचे प्रश्न नरेंद्र मोदी की शरद पवार या दोघांपैकी कोणाला अधिक समजतात, असा प्रश्न विचारला असता शेट्टी यांनी क्षणाचाही विलंब न लावता पवार यांचे नाव सांगितले.
शेट्टी म्हणाले, राजकारणात आलो तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत आलो आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांसाठी ऋण मुक्त अभियान ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. १ मे पासून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होण्यासाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे. युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी संघर्ष यात्रेवर सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत असलेल्या टिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)