प्रचारसभेतील गर्दी पाहून शरद पवारही भारावले
By Admin | Updated: October 10, 2014 01:02 IST2014-10-10T01:02:51+5:302014-10-10T01:02:51+5:30
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रचारसभेतील गर्दी पाहून शरद पवारही भारावले
बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. प्रचार सभेला झालेली गर्दी पाहून खुद्द पवार हेदेखील भारावून गेले. छायाचित्र काढण्यासाठी पुढे सरसावलेल्या छायाचित्रकारांना त्यांनी गर्दीचा फोटो काढण्याचा सल्लाही दिला.
उमेदवार गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी ते आले होते. तब्बल ८ हजारांहून अधिक जनसमुदाय सभेला आला होता. भर उन्हातदेखील कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. पवार भाषणाला उभे राहिल्यावर ते कथोरेंवर काहीतरी टीका करतील, ही अपेक्षा मतदारांना होती. त्याप्रमाणे त्यांनी कथोरेंची खिल्ली उडवून भाजपाला कडाडून विरोध केला. आघाडीच्या सरकारमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप भाजपा करीत असेल तर भाजपा गुन्हेगारांना उमेदवारी का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आरोपानंतर संपूर्ण सभेत टाळ्यांचा कडकडात झाला. गोटीराम पवार यासारख्या सज्जन माणसाला मुरबाडकर निवडून देतील, असा विश्वास शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केला. या सभेदरम्यान अनेक काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सभेला पालकमंत्री गणेश नाईक, आर.सी. पाटील, प्रमोद हिंदुराव, सुभाष पिसाळ, दशरथ तिवरे, श्रीधर पाटील आणि उमेदवार गोटीराम पवार उपस्थित होते.
(प्रतिनिधी)