Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: नगरसेवक, आमदार, खासदार आपलेच निवडून आणायचे. अमराठी मतदारसंघ बनवून हा सगळा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू आहे. तुम्ही खडकासारखे टणक राहा. प्रत्येकाशी मराठीतच बोला. तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका. भाजपाचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे. समुद्रात बुडवून बुडवून मारू. हा आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. जर का मराठी माणसाच्या वाटेला जाल, तर तुमचा गाल आणि आमचा हात याची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील जाहीर सभेत दिले. यावर निशिकांत दुबे यांच्यासह राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही प्रतिक्रिया दिली.
ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती विविध विषयांवर अगदी स्पष्ट शब्दांत भाष्य करत असतात. चातुर्मासाची सुरुवात झाली असून, शंकराचार्य मुंबईत आहेत. ठाकरे बंधूंची युती, मराठी अस्मिता, हिंदी सक्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची निवृत्ती अशा अनेक विषयांवर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सविस्तर मते मांडली. मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा दावा केला जात आहे. यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
हे राजकीय डावपेच, सगळे तर्क आधारहीन आहेत
मुंबईला गुजरातशी जोडण्याची योजना असेल, तर ते यांना कसे समजले. जिथे बैठका होत होत्या, तिथे हे होते का? मुंबईला गुजरातशी जोडले जाण्याचा डाव आहे, हे त्यांना कसे समजले. गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते आणि महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. मराठीच्या नावाखाली महाराष्ट्र वेगळा झाला आणि गुजरात राज्य गुजरातीच्या नावाखाली निर्माण झाला. मग आता मराठी मुंबई गुजरातमध्ये कसे जाईल? गुजरात महाराष्ट्रात कसा जाईल? भाषेच्या नावाखाली गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये झाली. मग हिंदी भाषा सुरू करून मुंबईला गुजरातशी कसे जोडणार? महाराष्ट्रात जशी हिंदी आहे, तशीच गुजरातमध्ये आहे. हे सगळे तर्क आधारहीन आहे. हे राजकीय डावपेच आहेत, असे सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.
बुद्धिमान लोकांनी हिंसाचाराला किती प्रमाणात स्थान देणे योग्य आहे?
राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यात सुरू असलेल्या वादावर बोलताना, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, हा राजकीय आखाडा आहे. दुर्दैवाने यात उतरलेले पैलवान हिंसक भाषेलाच चांगली भाषा समजत आहेत. मग ते निशिकांत दुबे असोत किंवा राज ठाकरे दोन्ही नेते तशीच भाषा बोलत आहेत. बुद्धिमान लोकांनी हिंसाचाराला किती प्रमाणात स्थान देणे योग्य आहे? त्याचा विचार केला पाहिजे. भाषा आपल्याला आईकडून मिळते किंवा गुरुकडून मिळते. आई कधी हिंसा करायला शिकवत नाही, गुरूही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाहीत. भाषेला हिंसा जोडण्याचे काम राजकारणी करत आहेत, हे मान्य होऊ शकत नाही, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना ही शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार स्वतःचा नाही, तर याच मातीतून त्यांना विचारांचा वारसा मिळाला आहे. तो विचार महाराष्ट्राच्या मातीचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. त्यांचा पराक्रम याची ओळख आहे. अशातच शिवसेनेचे कितीही तुकडे झाले, तरी प्रत्येक तुकडा शिवसेना म्हणूनच ओळखला जाईल. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर, विचारांवर चालेल, ती शिवसेनाच असेल. दोन्ही शिवसेनेकडून आपणच खरी असल्याचे दावे केले जात आहेत. आम्ही राजकारणी नाही आणि यांचे मतदार नाही. अशा परिस्थितीत खरी शिवसेना कोणती आणि खोटी शिवसेना कोणती, यावर कसे बोलता येणार, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.