शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !
By Admin | Updated: March 22, 2015 22:50 IST2015-03-22T22:50:59+5:302015-03-22T22:50:59+5:30
शिखर शिंगणापूरची मंगळवारपासून यात्रा : पूजेसाठी लागणारे साहित्य बनविण्यासाठी परिसरातील बचतगटांची लगबग--लोकमत विशेष...

शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !
शरद देवकुळे -पळशी --महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभूमहादेवाची यात्रा मंगळवार, दि. २४ पासून सुरू होत आहे. महादेवाच्या पूजेसाठी लागणारा भस्म आणि दावणा याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने यात्रेत या पूजा साहित्याची मोठी उलाढाल होते. सध्या परिसरात तीस ते चाळीस भट्ट्यांमधून सुमारे ५० टन भस्म तयार करण्यात आला आहे.
शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिखर शिंगणापूर येथे हजेरी लावतात. दि. २४ ते दि. ४ एप्रिलअखेर होणाऱ्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे. गावपरिसरात भस्म तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लागणारा कच्चा माल सांगली जिल्ह्यातील जत येथून आणला जातो. भस्म तयार करण्यासाठी पांढरी खडी, नारळाचे केशर, सुगंधी तेल यांचा वापर केला जातो. सुरुवातीला खडी भट्टीमध्ये भाजून घेतली जाते. पावडर झाल्यानंतर त्यात पाणी मिसळून साच्याच्या साह्याने छोट्या वड्या तयार केल्या जातात. त्यानंतर कडक उन्हात त्या सुकविल्या जातात. अशी प्रक्रिया करून तयार झालेला भस्म शिंगणापूर यात्रेत विक्रीसाठी पाठविला जातो.
शंभूमहादेवाच्या पूजेसाठी दावणाही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सुगंधी दावण्याची शेती येथील शेतकरी करत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतातील दावणा काढून त्याच्या जुड्या बांधून सुकवून ठेवल्या जातात. भस्म आणि दावणा याची मोठी उलाढाल शिंगणापूर यात्रेत होत असते. दोन लाखांच्या भांडवलातून बचतगटांना वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता एक ते दीड लाखाचा नफा होतो.