शक्ती-तुऱ्याच्या सामन्यातील परंपरा हरवतेय..!

By Admin | Updated: November 14, 2014 23:18 IST2014-11-14T22:59:50+5:302014-11-14T23:18:14+5:30

महिलांची नाराजी : पौराणिक ग्रंथांतील संदर्भाच्या आधाराऐवजी विकृती बळावली

Shakti-Turika match traditions are defeated ..! | शक्ती-तुऱ्याच्या सामन्यातील परंपरा हरवतेय..!

शक्ती-तुऱ्याच्या सामन्यातील परंपरा हरवतेय..!

शिरगाव : अल्पकाळात समाजासमोर आपली छबी दाखवायची असेल, तर किंबहुना वेगळ्या माध्यमातून ओळख करायची असेल, तर शक्तीवाले-तुरेवाले यांच्या जंगी सामन्याचे आयोजन हा प्रभावी उपाय राजकारणी मंडळींनी शोधून काढल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही ठराविक लोकांकडून या लोककलेला हिडीस स्वरूप दिले जात असल्याने महिलांनी आता त्याकडे पाठ फिरवली आहे.
आजकाल रायगड जिल्ह्यातील गायकी करणारे आणि तोच कायमचा व्यवसाय असलेली मंडळी चिपळूण तालुक्यात शक्ती - तुऱ्याचा जंगी सामना या कार्यक्रमात गायन करताना दिसत आहेत. पूर्वापार वालोपेतील दत्ता आयरे, घाणेकर अशा अभ्यासू व धार्मिक बाबींची माहिती असणारी व्यक्ती नाचांचा सामना भरवत होते. मोठ्या मैदानात वेशभूषा करुन नाचणारी मुले व सवाल जबाब असे स्वरुप होते. या सवाल जबाबातही रामायण, महाभारतातील, विविध ग्रंथातील संदर्भ कोडेस्वरुपात समोरच्याला काव्यातून घातले जात होते. समोरचा प्रतिस्पर्धी अभ्यासू असला तरच त्याचा टिकाव लागायचा आणि हार जीत होऊन नाच संपत होता. अलिकडे तीच पद्धत संस्कृतीकडून विकृतीकडे जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. कोणत्याही प्रकारे कितीही वेळ लागला तरी समोरच्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करायचेच, अशी भूमिका घेत महिला व पुरुष गायक सामना रंगवतात. मात्र, पारंपरिक स्पर्धा असेल अशी समजूत करुन आलेली मंडळी विशेषत: महिला पहिल्या पंधरा मिनिटातच कार्यक्रम सोडून जाणे पसंत करतात. दुसरीकडे त्याच सामन्यात गावागावातून आलेली मंडळी गायकाला प्रोत्साहन देत उभी राहतात.
जिंकण्यासाठी, नाव कमावण्यासाठी दुहेरी अर्थाच्या शब्दांचा वापर झाला तरी या सामन्याला धार्मिक संस्कृतीचा स्पर्श नाही, हे आजकाल कोणालाच सांगावे लागत नाही. मागील सहा महिन्यात चिपळूण पूर्व विभागात चार सामन्यांचा लाभ मध्यरात्रीपर्यंत अनेकांनी घेतला. हजारो रुपयांची सुपारी आणि रसिकांच्या टाळ्यांनी कार्यक्रम गाजला तरी अनेक महिला तसेच बुजुर्गांनी निषेधही केला आहे.
शक्ती-तुऱ्याचा नाच व गायकी याबाबत अग्रणी असणाऱ्या अभय सहस्त्रबुद्धे यांनी विकृतीचा यापूर्वीच निषेध केला आहे. नागावेतील सुरेश पालांडे यांनीही नाराजी व्यक्त करत संस्कृती संवर्धन ही सर्व हिंदू धर्मियांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत नोंदवले आहे. संयोजक मात्र मला असे काही बोलतील, अशी कल्पना नव्हती, असे सांगून नामानिराळे राहात असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

Web Title: Shakti-Turika match traditions are defeated ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.