शाहू-आंबेडकरांच्या विचारांनाच धोका

By Admin | Updated: October 10, 2014 00:36 IST2014-10-10T00:35:38+5:302014-10-10T00:36:57+5:30

पृथ्वीराज चव्हाण : सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत सभा; काँग्रेसला सत्ता देण्याचे आवाहन

Shahu-Ambedkar's thoughts are at stake | शाहू-आंबेडकरांच्या विचारांनाच धोका

शाहू-आंबेडकरांच्या विचारांनाच धोका

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारमुळे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनाच धोका निर्माण झाला आहे. सामाजिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता सामाजिक सैनिकांची भूमिका पार पाडावी. राज्यासह कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज, गुरुवारी येथील जाहीर सभेत केले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील मेरी वेदर मैदानावर ही सभा झाली.
चव्हाण म्हणाले, १५ वर्षांपूर्वी राज्यातील युती शासन काळात राज्य तळात गेले. त्या काळात कायदा-अर्थव्यवस्था कोलमडली होती. महाराष्ट्राला पुन्हा अव्वल करण्याचे काम काँग्रेसनेच केले. दुष्काळ, गारपिटीसारख्या अस्मानी संकटांना यशस्वीपणे तोंड दिले. भविष्यातील उद्योग, व्यापार, बेकारी, महागाई, आदी आव्हाने फक्त काँग्रेसच पेलू शकते.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, जातीच्या आधारावरील सरकार अधिक काळ टिकू शकत नाही. याचा अनुभव देशाने व राज्याने यापूर्वीही घेतला आहे. १९९५ ला युती शासनाच्या काळात ‘खंडणी राज’ सुरू होते. राज्यात सत्तेवर आल्यानंतर बजेटमधील पाच टक्के रक्कम मागासवर्गीयांसाठी खर्च करण्यात येईल.माणिकराव ठाकरे म्हणाले, मोदी सरकारचे गेल्या चार महिन्यांत कर्तृत्व दिसले आहे. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा उद्योग सुरू आहे. राष्ट्रवादीची अवस्थाही वाईट झाली आहे. अजित पवारांचे नेतृत्व फुसके असल्याचा दावा छगन भुजबळ यांनीच केल्याने पवारांची हवा निघून गेली आहे.
नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात दीड हजार कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. आमचे पार्टनर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी काम करायचे, त्यामुळे काँग्रेसपुढील अडचणी वाढत होत्या. काँग्रेसने संयुक्त व अखंडित ठेवलेला महाराष्ट्र आता भाजप तोडायला निघाले आहेत, असा आरोप पतंगराव कदम यांनी केला. काँग्रेस हे दुधाचे भांडे आहे, ते अबाधित ठेवा. काही मंडळी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना वेळीच ओळखून बाजूला करा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. काँग्रेसचे जिल्ह्यात आणि राज्यात वर्चस्व राहील, असा विश्वास पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला. या सभेत माजी खासदार जयवंतराव आवळे, सुरेश कुराडे, प्रकाश सातपुते यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार मालोजीराजे, स्वराज वाल्मीकी, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश, लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खारगे, आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पृथ्वीराज चव्हाण - मुंबई-बंगलोर इंडस्ट्रियल कॅरिडोर पूर्ण करणार.
सुशीलकुमार शिंदे - शाहूंच्या विचारांनुसारच काँग्रेसची वाटचाल.
माणिकराव ठाकरे - विचारांच्या लढाईत काँग्रेस विजयी होईल.
हर्षवर्धन पाटील - धर्मांध शक्तींच्या विरोधात उभे रहा.
सतेज पाटील - विरोधकांचा बहुरूपी चेहरा पुढे आला आहे.
पतंगराव कदम - जिरवा-जिरवीची भाषा, मतभेद बाजूला ठेवा.
जयवंतराव आवळे - या निवडणुकीत काँग्रेसची खरी परीक्षा आहे.
पी. एन. पाटील - काँग्रेसच अव्वल ठरेल.

मुंडे यांच्या मृत्यूची फेरचौकशी करा
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची फेरचौकशी करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सभेत केली.

Web Title: Shahu-Ambedkar's thoughts are at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.