शाहरूख खानला दोन लाखांचा दंड
By Admin | Updated: March 11, 2015 02:23 IST2015-03-11T02:23:54+5:302015-03-11T02:23:54+5:30
बॉलीवूडचा किंग शाहरूख खानच्या बंगल्याबाहेरचा बेकायदा रॅम्प तोडण्यासाठी पालिकेने २ लाख रुपये खर्च केले होते़ ही रक्कम जमा करण्यासाठी

शाहरूख खानला दोन लाखांचा दंड
मुंबई : बॉलीवूडचा किंग शाहरूख खानच्या बंगल्याबाहेरचा बेकायदा रॅम्प तोडण्यासाठी पालिकेने २ लाख रुपये खर्च केले होते़ ही रक्कम जमा करण्यासाठी शाहरूखला नोटीस पाठवून १२ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे़ अन्यथा ही रक्कम त्याच्या मालमत्ता करातून वसूल करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे़
वांद्रे पश्चिम बॅण्डस्टँड येथे शाहरूख खानचा प्रशस्त बंगला आहे़ त्याच्या वाहनांसाठी बंगल्याबाहेर रस्त्यावरच ९़५ मीटरचा रॅम्प बांधण्यात आलेला होता़ मात्र या रॅम्पमुळे वाहतुकीला अडथळा व गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांकडून होत होती़ त्यामुळे पालिकेने १४ फेब्रुवारी रोजी हा रॅम्प जमीनदोस्त केला होता़
या कारवाईचा खर्च भरण्याची ताकीद शाहरूखला ५ मार्च रोजी नोटीसद्वारे देण्यात आली होती़ पालिका अधिनियम ४९८(१) अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली़ त्यानुसार सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ ही मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे़ रक्कम न भरल्यास त्याच्या मालमत्ता करातूनच हा खर्च वळती करण्यात येईल़ (प्रतिनिधी)