राजू शेट्टी ठोकणार कांद्यासाठी शड्डू
By Admin | Updated: September 8, 2014 02:42 IST2014-09-08T02:42:05+5:302014-09-08T02:42:05+5:30
कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालावी.

राजू शेट्टी ठोकणार कांद्यासाठी शड्डू
मुंबई : कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र सरकारने कांदा आयातीवर बंदी घालावी. तसेच कांद्याचे दर वाढल्यावर निर्यात शुल्क लादून निर्यात रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने आता दर कमी झाल्यावर निर्यात अनुदान देण्याची तयारी दाखवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंगळवारपासून नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारचा पोरखेळ सुरू आहे. मध्यंतरी कांद्याचे दर वाढले होते तेव्हा कांद्याचे निर्यात शुल्क दोनवेळा वाढवून निर्यात रोखण्याचा प्रयत्न केला गेला. गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होऊन बाजारातील आवक घटल्याने लागलीच कांद्याची आयात सुरू केली गेली. ग्राहकांना दिलासा देण्याकरिता केंद्र कांद्याची निर्यात रोखण्याकरिता निर्यात शुल्क वाढवू शकते तर मग आता कांद्याचे दर कमी झाल्यावर कांद्याच्या निर्यातीकरिता अनुदान का देत नाही, असा सवाल त्यांनी केला.