‘सेझ’मधून दीड लाख रोजगारनिर्मिती होणार
By Admin | Updated: October 2, 2015 04:05 IST2015-10-02T04:05:58+5:302015-10-02T04:05:58+5:30
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये आकारास येणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्रातून (सेझ) तब्बल दीड लाख रोजगारनिर्मिती होणार आहे

‘सेझ’मधून दीड लाख रोजगारनिर्मिती होणार
मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये आकारास येणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्रातून (सेझ)
तब्बल दीड लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. डिसेंबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प २०१८ साली पूर्ण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी एकूण ६५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. या सेझमुळे आसपासच्या परिसरातील औद्योगिक आणि निवासी क्षेत्राची भरभराट होईल, असा दावा जेएनपीटीने केला आहे.
जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेझ प्रकल्पाबाबतचे विविध मुद्दे विशद केले. ते म्हणाले, २७७.३८ हेक्टर भूखंडावर सेझ प्रकल्प उभारण्यात येईल. प्रकल्पासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. भूसंपादनाबाबतही काही अडचणी नाहीत.
त्यामुळे डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल. प्रकल्पासाठी एकूण ६५० कोटी
रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प २०१८ साली पूर्ण होईल. प्रकल्पाद्वारे प्रत्यक्षात ३ ते ४ हजार रोजगारांची निर्मिती होईल. अप्रत्यक्षरीत्या दीड लाख रोजगार निर्माण होतील. प्रकल्पांतर्गत उच्च दर्जाचे बांधकाम करण्यात येईल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली जाईल.
‘क्लीन, ग्रीन आणि स्मार्ट’ या पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे हा सेझ प्रकल्प असेल. प्रकल्पामधील बांधकामांतर्गत येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राने प्रथमत: ४६८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रकल्पात ३ हजार ५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. हा प्रकल्प कार्गोलाही हातभार लावेल; आणि एकदा प्रकल्प पूर्ण झाला तर कार्गोचीही भरभराट होईल, असेही डिग्गीकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)