शाळेत लैंगिक शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 03:32 IST2016-09-05T03:32:12+5:302016-09-05T03:32:12+5:30
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत.

शाळेत लैंगिक शिक्षण
ठाणे : ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत. आता यापुढेही जाऊन किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी माहिती व्हावी, म्हणून त्यांना हे शिक्षण देण्याची पावले उचलली आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आठवी ते दहावीपर्यंतच्या ४९७५ विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या १२६ शाळा असून यामध्ये ३५ हजार ४२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता आठवी ते दहावीमध्ये यातील ४९७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचे आरोग्यविषयक अवलोकन पालिकेने केले होते. त्यानुसार, त्यांना आता लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. कुमारवयात या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे या वयात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ही मुले व्यसन अथवा इतर तत्सम दुर्गुणांना बळी पडू शकतात. त्यामुळे त्यांना यापासून वाचवण्यासाठी आता महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना लैंगिक शिक्षण देण्याची पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)
>‘जिज्ञासा’ची सलग २२ वर्षे
ठाण्यातील इन्स्टिट्यूट आॅफ सायकॉलॉजिकल हेल्थ किशोरवयीन मुलांसाठी जिज्ञासा हा कार्यक्रम मागील २२ वर्षे राबवत आहे. आता त्यांनाच या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी पाचारण केले जाणार आहे. ही संस्था कुमारवय, करिअर, ताणतणाव नियोजन, नातेसंबंध, व्यसनविरोधी विचार आणि मूल्य शिक्षण या सदराखाली शिक्षण देते. आता तेच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यात आठवी ते दहावीपर्यंतच्या ४९७५ विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी ५० याप्रमाणे बॅच बनवल्या जाणार असून एकूण १० बॅचेसमध्ये ५०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याला प्रतिसाद मिळाल्यास दुसऱ्या टप्प्यात पुन्हा विद्यार्थ्यांना याच माध्यमातून ते दिले जाणार आहे. प्रत्येक बॅचसाठी दोन दिवस प्रत्येकी तीन तास प्रतिदिन याप्रमाणे या शिक्षणाचे प्रयोजन करण्यात येणार आहे.