जन्मदात्याकडूनच लैंगिक अत्याचार, मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: June 11, 2016 03:59 IST2016-06-11T03:59:28+5:302016-06-11T03:59:28+5:30
जन्मदात्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर १८ वर्षीय मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली.

जन्मदात्याकडूनच लैंगिक अत्याचार, मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : जन्मदात्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर १८ वर्षीय मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मुलुंडच्या अग्रवाल रुणालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मुलुंड आणि ठाण्याच्या सीमेवर असलेल्या वार्ली पाडा परिसरात १८ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. गुरुवारी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तरुणीला धमकावून ते घराबाहेर पडले. वडील घराबाहरे पडताच घाबरलेल्या तरुणीने फिनेल पिऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. तरुणी उलट्या करत असल्याचे शेजारणीच्या लक्षात आले. तिने स्थानिकांच्या मदतीने तिला वेळीच मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या चौकशीत तरुणीने झालेला घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबातही तिने वडिलांनी अत्याचार केल्याचा आरोप केला. घटना ठाणे हद्दीत घडल्याने या प्रकरणी श्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र मुलगी खोटे बोलत असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)