सातबारा अद्ययावतीकरण लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:16 IST2016-12-31T02:16:48+5:302016-12-31T02:16:48+5:30
दोनदा मुदतवाढ देऊनही महसूल विभागाकडून संगणकीकृत सातबाराच्या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ ची नवी मुदत महसूल

सातबारा अद्ययावतीकरण लांबणार
वाशिम : दोनदा मुदतवाढ देऊनही महसूल विभागाकडून संगणकीकृत सातबाराच्या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ ची नवी मुदत महसूल विभागाने दिली होती. तथापि, २७ डिसेंबरपर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांनी ५० टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. के वळ पाच जिल्ह्यांनी ८० टक्क्यांवर काम पूर्ण केले आहे.
‘संगणकीकृत सात-बाराचे अद्ययावतीकरण करण्यास राज्यातील सर्व तलाठीवर्ग तयार आहे; मात्र इंटरनेटची कनेक्टिव्हिटी व वेग याच मुख्य समस्या आहेत. राज्यात इंटरनेटचे आधी तीन सर्व्हर होते. आता सहा झाले आहेत; परंतु वेग वाढला नाही. सात-बाराच्या ‘ई-फेरफार’ प्रकल्पासाठी ‘एडिट मॉड्युल’ नावाचे आॅनलाइन सॉफ्टवेअर महसूल विभागाला पुरविण्यात आले आहे. त्यामुळे हाताने लिहिलेले सातबारा व संगणकीकृत माहिती यांची पडताळणी केली जात आहे. नियोजनानुसार हे काम ३० जून रोजी संपवायचे होते; मात्र तांत्रिक सुविधांअभावी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यावेळेतही कामे झाली नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. यादरम्यान, तलाठी वर्गाचे आंदोलन, मनुष्यबळाची टंचाई, तसेच तांत्रिक सुविधांचा विचार करून पुन्हा या प्रकल्पासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत संपत आली असतानाही राज्यातील ३५ पैकी २३ जिल्ह्यांचे काम ५० टक्केही झालेले नाही.
राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व जुने सातबारा उतारे तपासून संगणकीय नोंदीची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एका तलाठ्याकडे २०-२० हजारांचे गट आहेत. राज्यातील ३५७ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात २ कोटी ४५ लाख ५२ हजार २४६ खातेदार आहेत. (प्रतिनिधी)
५० टक्क्यांहून कमी काम झालेले जिल्हे
चंद्रपूर (४९.६६), नाशिक (४५.८०), गोंदिया (४५.०२),परभणी (४४.३८), यवतमाळ (४४.२२), भंडारा (४३.७४), बुलडाणा (४२.०४), ठाणे (४१.९४), सोलापूर (४१.६०), अहमदनगर (३८.२२), कोल्हापूर (३७.५१), जळगाव (३२.१०), रायगड ३२.००), पालघर (२८.८४), धुळे (२५.४९), सातारा (२४.८२), पुणे (२४.५७), बीड (१६.०६), अमरावती (१५.८७), रत्नागिरी (१०.०७), सिंधुदुर्ग (६.२१) आणि सांगली (४.०१) या जिल्ह्यांचा समावेश आहे.