सातपुड्यातील सुताचे टॉवेल लंडनच्या मॉलमध्ये
By Admin | Updated: January 18, 2015 01:10 IST2015-01-18T01:10:54+5:302015-01-18T01:10:54+5:30
महाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली असताना शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या कपड्यांनी सातासमुद्रापार झेप घेतली आहे.

सातपुड्यातील सुताचे टॉवेल लंडनच्या मॉलमध्ये
रमाकांत पाटील - नंदुरबार
महाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली असताना शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या कपड्यांनी सातासमुद्रापार झेप घेतली आहे. सूतगिरणीच्या ‘टेरीटॉवेल’ला (टर्कीश टॉवेल) लंडनच्या मॉलमध्ये पसंती मिळत असून, निर्यातीतून पहिल्या दोन महिन्यांतच सूतगिरणीला २ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या उत्तम दर्जाच्या सुताच्या धाग्याने युरोपातील देशांनाही भुरळ घातली आहे. गेल्या १० वर्षांपासून चीन, बांगलादेश, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को आदी १५पेक्षाही अधिक देशांमध्ये धाग्याची निर्यात होत आहे. परिणामी, सूतगिरणीनेही उत्पादन क्षमता वाढविली आहे. सध्या रोज ४० हजार किलो सूत येथे तयार होते. मात्र केवळ सूत विक्रीवरच न थांबता त्यापासून रेडीमेड कपडे तयार करण्यासाठी सूतगिरणीने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू असून, त्याला अपेक्षेहून अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्यात होणाऱ्या टॉवेलची भारतीय बाजारपेठेतील किंमत प्रतिनग साधारणत: ७०० ते १२०० रुपयांपर्यंत आहे.
‘पाच एफ’ अर्थात फार्म, फार्मर, फायबर, फॅब्रिक्स आणि फॅशन असा सूतगिरणीचा कार्यसंकल्प आहे. पी.के. अण्णा पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे हा टप्पा गाठता आला. शेतकऱ्यांच्या कापसाला जास्तीतजास्त भाव देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला. त्याला प्राथमिक स्तरावर यश मिळाल्याने आता पुढच्या टप्प्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. या गारमेंटचा ‘लोकस्पीन’ या नावाने ब्रॅण्ड तयार करण्यात येणार आहे.
- दीपक पुरुषोत्तम पाटील,
अध्यक्ष, जयप्रकाश सूतगिरणी
सूतगिरणीतर्फे सध्या टी शर्ट, टॉवेल, बेडशिट, पांढरे कापड यासह इतर तयार कपडे बनविले जात आहेत. त्यांच्या विक्रीसाठी शहाद्यात स्वतंत्र शोरुमही तयार केले आहे.